Kajol On Deepika Padukone’s Spirit Controversy : बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथालेखक संदीप रेड्डी वंगा सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘स्पिरिट’मुळे चर्चेत आहेत. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे संदीप यावेळी थेट इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणशी पंगा घेतल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दीपिकाने अलीकडेच वंगा यांच्या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

दीपिका पादुकोणने संदीप रेड्डी वंगा यांचा ‘स्पिरिट’ चित्रपट सोडला. अभिनेत्रीने चित्रपट निर्मात्याकडून आठ तासांच्या शिफ्टची मागणी केली होती, जी पूर्ण झाली नाही; ज्यामुळे तिने चित्रपट सोडला. आता काजोलने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. काजोलने अलीकडेच सांगितले की, तिने कधीही २०-३० तास सतत काम केले नाही आणि १९९० च्या दशकात तिच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून तिने वर्क-लाइफ बॅलेन्स केले आहे.

पीटीआयशी बोलताना काजोलने सांगितले की, ती अशा काही कलाकारांपैकी एक आहे, जी एकाच वेळी एकाच चित्रपटावर लक्ष केंद्रित करते; तर जवळजवळ सर्व कलाकार एकाच वेळी अनेक चित्रपटांमध्ये काम करतात. काजोलने असाही जोर दिला की, तिने कधीही जास्त काम केले नाही आणि वेळेनुसार काम केले. ती म्हणते की तिच्या आईने या निर्णयात तिला पूर्ण पाठिंबा दिला.

एका वेळी एकच चित्रपट शूट करायचे : काजोल

काजोल म्हणते, “मी अशा काही लोकांपैकी एक होते, जे एका वेळी फक्त एकाच चित्रपटात काम करायचे. मी एकाच वेळी चार चित्रपट करत नव्हते. मी एक चित्रपट पूर्ण करायचे, नंतर दुसरा सुरू करायचे. मी कधीही २० किंवा ३० तास काम केले नाही. मी नेहमीच स्पष्ट होते की, मी फक्त ठराविक काळासाठीच काम करेन आणि माझ्या आईनेही यात मला खूप साथ दिली.’

न्यासाच्या जन्मानंतरच्या परिस्थितीची आठवण करून देताना काजोल म्हणाली की, तिचा पती अजय देवगण आणि इतर चित्रपट निर्मात्यांनी खूप साथ दिली. चित्रपट निर्मात्यांनी तिच्या महत्त्वाच्या मागण्या कोणत्याही आडकाठीशिवाय पूर्ण केल्या. ती म्हणते की, आई झाल्यानंतर तिने ज्यांच्याबरोबर काम केले, ते सर्व जण समजून घेत होते आणि गरज पडल्यास तिला काम लवकर पूर्ण करण्याची परवानगी देत होते.

२००८ मध्ये ‘यू, मी अँड हम’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काजोलचे वडील रुग्णालयात दाखल झाले होते आणि तिची मुलगी न्यासा फक्त दोन वर्षांची होती. अजय, जो चित्रपटाचा निर्मातादेखील होता, त्याने काजोलला लवकर घरी परतता येईल याची काळजी घेतली. २००६ मध्ये ‘फना’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान युनिटने कोणत्याही औपचारिक अटींशिवाय तिच्या म्हणण्यानुसार काम केले.

‘माँ’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान, अजय देवगण आणि काजोल यांना विचारण्यात आले होते की, अलीकडेच आई झालेल्या अनेक अभिनेत्री आठ तासांच्या शिफ्टची मागणी करत आहेत. यावर अजय म्हणाला होता की, इंडस्ट्रीतील बहुतेक प्रामाणिक चित्रपट निर्माते या मागणीचा आदर करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.