दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. लवकरच त्यांचा ‘ठग लाईफ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या म्युझिक लाँचचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कमल हसन यांनी कन्नड भाषेबद्दल वक्तव्य केलं होतं. यानंतर कमल हसन वादाच्या भोवऱ्यात अडकले. कन्नड भाषेचा अपमान केल्याचा दावा करत कर्नाटकामधील लोकांनी अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली.
‘ठग लाईफ’ चित्रपटाच्या म्युझिक लाँचच्या कार्यक्रमात कमल हसन यांनी ”कन्नड भाषेचा जन्म तामिळ भाषेतून झाला आहे,” असं वक्तव्य केलं होतं. यानंतर कर्नाटका येथील लोकांनी कमल हसन यांचा निषेध करत त्यांनी यासाठी माफी मागावी अशी मागणी केली होती. तर कर्नाटका फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (KFCC) ने कमल हसन जोवर माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांचा ‘ठग लाईफ’ चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित होणार नसल्याचं जाहीर केलं होतं. अशातच आता कमल हसन यांनी ‘ठग लाईफ’ हा चित्रपट कर्नाटकामध्ये प्रदर्शित होण्याकरता कर्नाटकातील उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे. अद्याप कमल हसन यांनी माफी मागितलेली नाही.
अभिनेते व राजकारणी कमल हसन यांनी काही दिवसांपू्र्वी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली होती. कमल हसन म्हणाले होते, ”मी चुकीचं बोललो असेन तर माफी मागेन अन्यथा नाही, अशीच माझी जीवनशैली आहे.” यासह कमल हसन यांच्या वादावर कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीसुद्धा कमल हसन यांच्या या वक्तव्याला विरोध करत कन्नड भाषेचा खूप मोठा इतिहास असून कमल हसन यांना तो माहीत नसल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे कमल हसन जोपर्यंत माफी मागत नाही तोवर ‘ठग लाईफ’ चित्रपट कर्नाटकामध्ये प्रदर्शित होइल याची शक्यता फार कमी असल्याचं दिसतं.
प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम दिग्दर्शित ‘ठग लाईफ’ या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट येत्या ५ जूनला प्रदर्शित होणार आहे. ‘ठग लाईफ’मध्ये कमल हसन यांच्यासह अभिनेत्री त्रिशा कृष्णन, महेश मांजरेकर, सिलंबरासन हे कलाकार झळकणार आहेत. परंतु, कमल हसन यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.