बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगनाने कृषी कायदे रद्द केल्यानंतर आणखी एक पोस्ट केली आहे. यात तिने इंदिरा गांधी यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या चपलीखाली डासांप्रमाणे चिरडल्याचं वक्तव्य केलं आहे. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. यानंतर आता शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी कंगनावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. “या अभिनेत्रीला तुरुंगात टाका किंवा वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी कंगनाच्या या पोस्टवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “या अभिनेत्रीला एकतर तुरुंगात टाकावे किंवा तिला वेड्यांच्या रुग्णालयात पाठवावे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिची मानसिक स्थिती कशी आहे हे स्पष्टपणे दिसते,” असे ते म्हणाले.

“इंदिरा गांधींनी खलिस्तान्यांना आपल्या चप्पलेखाली डासांप्रमाणे चिरडलं अन्…”, कंगनाच्या नव्या पोस्टवर वाद

“कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा अपमान झाला आहे. ती द्वेषाची एक फॅक्टरी बनली आहे. विशेष म्हणजे तिच्या इन्स्टाग्रामवरील द्वेषपूर्ण पोस्ट टाकल्याबद्दल आम्ही कठोर कारवाईची मागणी सरकारकडे करत आहोत. तसेच सरकारने कंगनाला दिलेली सुरक्षा आणि पद्मश्री पुरस्कार तात्काळ मागे घेण्यात यावा. तिला एकतर तुरुंगात पाठवावे किंवा एखाद्या वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करावे,” असेही त्यांनी म्हटले.

कंगना नेमकं काय म्हणाली?

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत म्हटलं, “खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतील, पण एका महिलेला विसरायला नको. देशाच्या एकमेवर महिला पंतप्रधानाने त्यांना आपल्या चप्पलेखाली चिरडलं होतं. अशावेळी त्यांच्यामुळे या देशाला किती सहन करावं लागलं ते महत्त्वाचं नाही. इंदिरा गांधींनी स्वतःच्या जीवाची किंमत देऊन यांना डासांप्रमाणे चिरडलं. त्यांनी देशाचे तुकडे होऊ दिले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशकं झाली तरी त्यांच्या नावाने हे थरथर कापतात. त्यांना असाच गुरू पाहिजे,” असंही कंगनाने सांगितलं.

तर कंगनाने तिच्या दुसऱ्या एका इंस्टास्टोरीत इंदिरा गांधी यांचा फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं, “देशात खलिस्तानी चळवळ फोफावत असताना इंदिरा गांधी यांची गोष्ट याआधी पेक्षा अधिक कालसुसंगत होत आहे. … लवकरच तुमच्यासाठी आणीबाणी आणेल.” असे ती म्हणाली होती.

कंगना रणौत वक्तव्याविरोधात तक्रार दाखल

कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार ही मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये करण्यात आली आहे. या शीख समुदायाच्या मते, कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे. तसेच तिने शीख समुदायविरोधात वक्तव्य करतेवेळी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला आहे, असे शीख समुदायाचे म्हणणं आहे.