बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. कंगनाच्या वक्तव्यामुळे तिच्यावर टीका केली जात आहे. हे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा कंगनाने एक मोठी इन्स्टाग्राम पोस्ट लिहित त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

कंगनाने इन्स्टाग्रामवर बीबीसी न्यूजची एक जुनी बातमी शेअर केली आहे. या फोटोला तिने भलेमोठे कॅप्शन दिले आहे. “२०१५ ला बीबीसीने हा लेख प्रकाशित केला आहे. यात लेखात असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, ब्रिटनने भारताला कोणतीही भरपाई देणे आवश्यक नाही. मग गोरे साम्राज्यवादी किंवा त्यांचे समर्थक का आणि कशासाठी अशा मूर्ख गोष्टी लिहू शकतात? जर तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मी ‘टाइम्स नाऊ’ समिटमध्ये केलेलं वक्तव्य हे याचं उत्तर आहे, असे कंगना म्हणाली.

कंगनाच्या आझादीच्या ‘त्या’ विधानाचा अर्थ सांगतेय कॉमेडियन सलोनी गौर; व्हिडीओ व्हायरल

“कारण भारतात घडलेल्या अगणित गुन्ह्यांसाठी आपल्या राष्ट्र निर्मात्यांनी इंग्रजांना दोष दिला नाही. त्यांनी देशाच्या मालमत्तेची लूट केली आणि आपल्या देशाची दोन तुकड्यांमध्ये विभागणी करण्यासाठी आमच्या स्वातंत्र्यसैनिकांची हत्या केली,” असे कंगना म्हणाली.

“दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीशांनी स्व:इच्छेने भारत सोडला. त्यानंतर विंस्टन चर्चिल यांनी स्वत:ला एक युद्ध नायक म्हणून दाखवले. पण ही तीच व्यक्ती होती जी बंगलाच्या दुष्काळासाठी जबाबदार होती. तसेच स्वतंत्र भारतात त्याच्या गुन्ह्याबद्दल त्याला कधीही शिक्षा झाली का? नाही. सिरिल रॅडक्लिफ हा गोरा इंग्रज जो यापूर्वी भारतात कधीच आला नव्हता. त्याला ब्रिटिशांनी अवघ्या ५ आठवड्यात फाळणी करण्यासाठी आणले होते. काँग्रेस आणि मुस्लीम लीग या समितीचे सदस्य होते आणि त्यांनी ब्रिटिशांच्या अटींनुसार फाळणी मान्य केली. त्यामुळे लाखो लोकांचे प्राण गेले. यात ज्यांचे प्राण गेले त्यांना स्वातंत्र्य मिळाले का? या हत्याकांडासाठी ब्रिटिश किंवा ज्या काँग्रेसने या फाळणीला सहमती दिली होती त्यांना जबाबदार धरण्यात आले होते का?” असा प्रश्नही तिने विचारला आहे.

“…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन”, स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर कंगनाची प्रतिक्रिया

दरम्यान कंगनाच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच आम आदमी पार्टीने कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे. भाजपा खासदार वरुण गांधी यांनीही कंगनाच्या वक्तव्यावर टीका करत त्याची तुलना देशद्रोहाशी केली आहे.