बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनाचा बहुचर्चित ‘थलायवी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनाच्या निमित्ताने कंगनाने सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’ या शोमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यानचे काही प्रमोशनल व्हिडीओ समोर आले आहेत. यावेळी कपिलने कंगनाला सिनेसृष्टीपासून, राजकीय क्षेत्रासंबंधित केलेल्या अनेक वादांबद्दलचे प्रश्न विचारले. विशेष म्हणजे कंगनानेही कपिलच्या या सर्व प्रश्नांना सडेतोड उत्तर दिली.

कंगनाने कपिल शर्मा या शोमध्ये एंट्री करण्यापूर्वी तिचे अनेक सुरक्षारक्षक चित्रीकरणाच्या सेटवर पोहोचले. यानंतर ती स्वत: त्या ठिकाणी पोहोचली. या मुद्द्यावरुन कपिलने तिची मस्करी करण्यास सुरुवात केली. “सेटवर एवढे सुरक्षारक्षक पाहून आम्हाला भीती वाटत होती. आम्ही काही वादग्रस्त म्हटलं आहे की काय? असा प्रश्नही आम्हाला पडला होता.” “एखाद्या व्यक्तीला एवढे सुरक्षारक्षक हवे असल्यास त्याला काय करावे लागते?” असा सवाल कपिलने कंगनाला विचारला. यावेळी कंगनाने टोला लगावत कपिलला उत्तर दिले, ती म्हणाली, “जर एवढे सुरक्षारक्षक हवे असतील तर त्या व्यक्तीला खरं बोलावं लागतं.”

सोनी टीव्हीवरील हा प्रमोशनल व्हिडीओ साधारण २ मिनिटांचा आहे. मात्र हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. याच व्हिडीओमध्ये कपिल कंगनाला हसत हसत विचारतो, “तुला कसं वाटतंय, एवढे दिवस झालेत, काहीही वादग्रस्त घडलेले नाही.” कपिलच्या या प्रश्नावर कंगना काहीही उत्तर देत नाही. मात्र या प्रश्नामुळे ती जोरजोरात हसते.

तर दुसरीकडे अभिनेता कृष्णा अभिषेक हा एका पार्लरवालीच्या स्वरुपात तिच्या समोर येतो. तो कंगनाकडे कपिलची तक्रार करतो. “मॅडम या माणसाने माझे पार्लर तोडले आणि जेव्हा आपली कोणतीही गोष्ट तुटते, तेव्हा आपली भावना काय असते, हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे?” असा टोलात्मक सवाल कृष्णा अभिषेक कंगनाला विचारतो. या प्रश्नानंतरही कंगना काहीही न बोलता फक्त हसते.

एवढंच नव्हे तर गेल्या वर्षाभरात तिने केलेली अनेक वादग्रस्त वक्तव्य, मुंबई महापालिकेसोबतचा वाद, ट्वीटर अकाऊंट रद्द होणे यासंह अनेक मुद्द्यांवर कपिलने तिला प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या सर्वांवर तिने नेमके काय उत्तर दिले? कोणत्या मुद्द्यांवर तिने काय मत मांडले? हे अद्याप समोर आलेले नाही. कपिल शर्माचा हा भाग लवकरच प्रसारित होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यानंतरच या सर्व प्रश्नांवर खुलासा होण्याची शक्यता आहे.