Kantara Chapter 1 box office day 10 : ऋषभ शेट्टीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, बॉक्स ऑफिसवर राज्य करणे ही त्याच्यासाठी मोठी गोष्ट नाही. २०२२ मध्ये ब्लॉकबस्टर ‘कांतारा’नंतर ऋषभ शेट्टीने त्याच्या सीक्वेलसह बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले आहे. ऋषभने ‘कांतारा’चा सीक्वेल बनवण्यासाठी तीन वर्षे घालवली. २०२२ नंतर ‘कांतारा’चा दुसरा भाग २ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला.

‘कांतारा चॅप्टर १’ने अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. अशा परिस्थितीत आज ‘कांतारा चॅप्टर १’ प्रदर्शित होऊन १० दिवस झाले आहेत. दरम्यान, ‘कांतारा चॅप्टर १’चे शनिवारचे आकडे समोर आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया आतापर्यंत त्याने किती कमाई केली आहे.

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित, ‘कांतारा चॅप्टर १’ प्रेक्षकांना भावत आहे. ऋषभ शेट्टीने ‘कांतारा’मध्ये लेखन, दिग्दर्शन या जबाबदाऱ्या सांभाळतानाच मुख्य भूमिकाही साकारली आहे. वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा रोमँटिक कॉमेडी ड्रामा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ त्याच दिवशी प्रदर्शित झाला. पण, त्याचा ‘कांतारा चॅप्टर १’वर अजिबात परिणाम झाला नाही. त्याच्या १० व्या दिवसाच्या कलेक्शनसह ‘कांतारा चॅप्टर १’ने या वर्षीच्या ‘सैयारा’च्या भारतातील नेट कलेक्शनला मागे टाकले, ज्याने ३२९.२ कोटी कमावले. त्यासह ‘कांतारा चॅप्टर १’ आता वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.

१२५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या ‘कांतारा चॅप्टर १’ने पहिल्या दिवशी ६१.८५ कोटी रुपये कलेक्शन केले. आता त्याचे शनिवारचे कलेक्शन प्रसिद्ध झाले आहे. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार, १० व्या दिवशी ‘कांतारा चॅप्टर १’ने ३७ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. अशा प्रकारे भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे आतापर्यंत एकूण कलेक्शन ३९६.६५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

‘कांतारा चॅप्टर १’ गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. आणि त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘कांतारा चॅप्टर १’ या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘कांतारा चॅप्टर १’ने बॉक्स ऑफिसवर दमदार, रेकॉर्ड ब्रेकिंग ओपनिंग केली होती. ‘कांतारा चॅप्टर १’ जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, तमीळ व मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.