बॉलिवूड निर्माता- दिग्दर्शक करण जोहर त्याचा शो ‘कॉफी विथ करण’च्या आगामी सीझनमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. या शोमधून करण जोहर बॉलिवूड सेलिब्रेटीशी गप्पा मारताना दिसतो. सेलिब्रेटीच्या वैयक्तीक आयुष्यातील बऱ्याच सीक्रेट्सचा खुलासा करण जोहरच्या या शोमध्ये होताना दिसतो. करण जोहरचा हा शो प्रेक्षकांमध्ये बराच लोकप्रिय आहे. पण अनेकदा हा शो वादाच्या भोवऱ्यातही सापडला आहे. तसेच करणच्या या शोवर बरेचदा टीका देखील झाली आहे. पण करणच्या मते त्याला या गोष्टींमुळे फारसा फरक पडत नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीत करण जोहरनं या शोबाबत बरेच खुलासे केले आहेत.

करण जोहरच्या या शोमध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सहभागी झाले आहेत आणि या शोमध्ये केलेल्या काही वक्तव्यांमुळे हे सेलिब्रेटी सोशल मीडियावर वादाचा मुद्दाही ठरले आहेत. अशा वादांबद्दल बोलताना करण जोहर म्हणाला, “सोशल मीडियावर एकेकाळी बॉलिवूडबाबत बरंच वाईट बोललं जात होतं. ज्यात ‘कॉफी विथ करण’वरून देखील बरेच वाद झाले. शोवर टीका झाली. पण मला माहीत होतं हे सगळं केवळ सोशल मीडियापर्यंत मर्यादित आहे. याचा बिझनेसशी काहीच संबंध नाही. हे सर्वच सत्य नाहीये, कारण जर हे सगळं खरं असतं तर मग डिज्नी हॉटस्टारनं हा शो करण्याची जोखीम उचलली नसती. कोणताही सेलिब्रेटी या शोमध्ये येण्यासाठी तयार झाला नसता.”

आणखी वाचा- “रोमँटिक वातावरण…” म्हणत मलायकानं शेअर केला व्हिडीओ, अर्जुनच्या काकांची कमेंट चर्चेत

करण जोहर पुढे म्हणाला, “जर शोवर केली जाणारी टीका ही खरी असती तर मी स्वतः हा शो करण्यामध्ये अजिबात रुची दाखवली नसती. ही टीका, नकारात्मकता हा केवळ भ्रम आहे हे मला नेहमीच जाणवतं. हे सर्व वास्तवात कुठेच नसतं. ज्या बॉलिवूडला तुम्ही मागच्या १०० वर्षांपासून प्रेम देत आहेत. त्या बॉलिवूडचा तुम्ही अशाप्रकारे अचानक तिरस्कार कसं काय करू शकता. माझ्या शोवर जी टीका केली जाते त्याची मला अजिबात चिंता नाही. कारण मला माहीत आहे. हे सगळं कधीतरी संपणार आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करण जोहरच्या याच शोमध्ये कंगना रणौतनं त्याला ‘बॉलिवूडचा नेपोटिजम किंग’ असं म्हटलं होतं. कंगनाच्या या आरोपापासून ते हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी महिलांवर केलेल्या आक्षेपार्ह कमेंटपर्यंत वेगवेगळ्या कारणांनी हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सगळ्या वादांवर बोलताना करण म्हणाला, “हा शो कोणत्याही वादामुळे नाही तर सेलिब्रेटींमुळे सुपरहिट ठरला आहे. ट्रोलिंगमुळे हा शो सुपरहिट होत नाही. तर सेलिब्रेटी आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शो एवढा यशस्वी ठरला आहे.” दरम्यान या शोचा ७ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून हा सीझन डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे.