ronit roy reveals kareena kapoor was attacked after saif ali khan : या वर्षाच्या सुरुवातीला बॉलीवूडचा ‘नवाब’ सैफ अली खानवर चाकूने हल्ला केल्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला होता. वांद्रे येथील राहत्या घरात सैफ आली खानवर चोराने चाकू हल्ला केला होता.

आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉय यांनी खुलासा केला आहे की, सैफवर हल्ला झाल्यानंतर करीना कपूरवरदेखील सौम्य हल्ला झाला होता, ज्यामुळे ती घाबरली होती.

घरी सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर पतौडी कुटुंबाने त्यांची सुरक्षा एजन्सी बदलली. या हल्ल्यानंतर त्यांनी सर्व काही हाताळण्यासाठी रोनित रॉयची सुरक्षा एजन्सी नियुक्त केली. अलीकडेच झालेल्या संभाषणात रोनितने एका धक्कादायक घटनेबद्दल सांगितले.

सैफ रुग्णालयात असताना करीनावरही झाला होता हल्ला

हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत रोनित रॉय यांनी सांगितले की, जेव्हा सैफ रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर घरी परतत होता तेव्हा मीडियाची खूप गर्दी होती. यादरम्यान, जेव्हा करीनादेखील रुग्णालयातून घरी जात होती, तेव्हा तिच्या गाडीवर सौम्य हल्ला झाला होता.

गाडीला धक्का देण्यात आला आणि नंतर काही लोक…

रोनित म्हणाला, “करीना कपूरच्या गाडीला थोडासा धक्का मारला आणि नंतर काही लोक खूप जवळ आले. या घटनेमुळे ती घाबरली आणि तिने मला सैफला घरी आणण्यास सांगितले.” तो पुढे म्हणाला, “मग मी सैफला घेण्यासाठी गेलो आणि तो घरी पोहोचेपर्यंत आम्ही पूर्ण सुरक्षा व्यवस्था केली होती. तसेच, पोलिसांकडून चांगला पाठिंबा मिळाला. आता सर्व काही ठीक आहे.”

या घटनेनंतर रोनित रॉय यांच्या सुरक्षा एजन्सीला सैफच्या घराची जबाबदारी देण्यात आली. रोनित यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी सैफच्या घराची रेकी केली तेव्हा त्यांना सुरक्षेत अनेक त्रुटी आढळल्या. त्यांनी अनेक आवश्यक बदल सुचवले, जे नंतर अमलात आणण्यात आले.

१६ जानेवारी रोजी सकाळी एक चोर सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात घुसला आणि त्याचा धाकटा मुलगा जेहच्या खोलीतून घुसला. त्यादरम्यान सैफवर सहा वेळा चाकूने वार करण्यात आले, त्यापैकी दोन वेळा त्याच्या मणक्याजवळ झालेले वार खूप गंभीर होते. डॉक्टरांनी त्याच्या शरीरातून २.५ इंच लांबीचा चाकूचा तुकडा काढला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सैफ अली खान अलीकडेच नेटफ्लिक्सवरील ‘ज्वेल थीफ’ चित्रपटात दिसला होता. यापूर्वी त्याने ज्युनियर एनटीआरच्या ‘देवारा: पार्ट १’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. १७ वर्षांनंतर तो आता अक्षय कुमारबरोबर प्रियदर्शनच्या ‘हैवान’ या थ्रिलर चित्रपटात दिसू शकतो, अशी चर्चा आहे. सध्या सैफ त्याच्या कुटुंबासह लंडनमध्ये सुट्टी घालवत आहे. करीना कपूर तिच्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करीत आहे.