अनेक वर्षांपासून करिश्मा कपूर बॉलीवूड इंडस्ट्रीत सक्रिय आहे. करिश्मा कपूर ही एका फिल्मी कुटुंबातील असून, तिने खूप मोठा प्रवास केला आहे. अभिनेत्रीने ९०च्या दशकातला शूटिंगचा अनुभव सांगितला आहे.

आजच्या कलाकारांकडे वेगवेगळे शेफ आणि अनेक व्हॅनिटी व्हॅन असतात; पण १९९० च्या दशकात असं नव्हतं. सेलिब्रिटींसाठी स्वच्छ शौचालय असणं हीदेखील मोठी गोष्ट होती. करिश्मानं याबद्दल असंही सांगितलं आहे की, शौचालय वापरण्यासाठी दूर जावं लागायचं.

करिश्मा कपूरनं तिच्या कारकिर्दीत चित्रपट निर्मिती तंत्रात झालेल्या बदलांबद्दलही माहिती दिली. ती म्हणाली, “आम्ही असे चित्रपट बनवले आहेत, जिथे आम्ही फक्त डबिंग करायचो. मी पहिल्यांदा स्वतःला ‘दिल तो पागल है’मध्ये मॉनिटरवर पाहिले. त्याआधी आम्ही कधीही फुटेज पाहिले नव्हते. जेव्हा चित्रपट ७० मिमी मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला तेव्हाच आम्हाला त्याचा रिझल्ट दिसला.”

करिश्मा कपूर पुढे म्हणाली की, शूटिंगदरम्यान कलाकारांना स्वतः सगळ्याची व्यवस्था करायला लागायची. ती म्हणाली, “आम्ही अनेकदा रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये थांबायचो किंवा कोणाचे तरी दार ठोठवायचो आणि विचारायचो, ‘आम्ही इथे कपडे बदलू शकतो का? आम्ही बाहेर गाण्याचे शूटिंग करीत आहोत.’ तेथून आजच्या इंडस्ट्रीपर्यंत – जिथे बाहेर ३५ ट्रेलर आहेत, नवीन डिजिटल मीडिया आहे आणि आधुनिक साउंड सिस्टीम आहेत – हे खरोखरच कल्पनेच्या पलीकडे आहे.”

वयाच्या १६ व्या वर्षी पदार्पण केले

करिश्माने वयाच्या १६ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. गेल्या वर्षी ‘लेडीज स्टडी ग्रुप’ कार्यक्रमात बोलताना तिने जुने किस्से सांगितले. ती म्हणाली, “इंडस्ट्रीमध्ये ३२ वर्षे काम करत आहे, मी अशा काळात काम केलं आहे जे तुमच्यापैकी अनेकांना खोटं वाटेल. आम्ही झुडुपांच्या मागे कपडे बदलायचो. जर एखाद्याला बाथरूममध्ये जावं लागलं, तर आम्ही मैलभर चालत जायचो आणि संपूर्ण युनिट कुजबुजायचं, ‘अरे, मॅडम टॉयलेटला जात आहेत. आम्ही प्रत्यक्षात तो काळ पहिला आहे.’

करिश्मा कपूरनं ‘राजा हिंदुस्तानी’,’हम साथ साथ हैं’, ‘हीरो नंबर १′,’राजा बाबू’,’बीवी नंबर १′ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून अभिनयाचा ठसा उमटवला. करिश्मानं तिच्या करिअरमध्ये इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे.