KBC 17 Boy Ishit Bhatt Reaction: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन २५ वर्षांपासून कौन बनेगा करोडपती या प्रसिद्ध शोचे सूत्रसंचालन करत आहेत. त्यांच्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे हा कार्यक्रम २५ वर्ष लोकांच्या मनात आहे. केबीसीचा १७ वा हंगाम सुरू असून केबीसी ज्युनिअरमध्ये काही दिवसांपूर्वी सामील झालेला पाचवीतील १० वर्षांचा विद्यार्थी इशित भट्ट चर्चेचा विषय ठरला. वयाने आणि कर्तुत्वाने ज्येष्ठ असलेल्या अमिताभ बच्चन यांच्यासमोर आततायीपणा केल्यामुळे इशित ऑनलाइन ट्रोलिंगचा बळी ठरला. त्याच्यावर आणि त्याच्या पालकांवर टीका होत असताना आता इशित भट्टच्या नावाने उघडण्यात आलेल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
इन्स्टाग्राम हँडलची खातरजमा नाही
@ishit_bhatt_official नामक इन्स्टाग्राम हँडलवरून इशित भट्टचे केबीसीमधील काही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी एका पोस्टमध्ये इशित भट्टच्या नावाने दिलगिरी व्यक्त करण्यात आली. मात्र हे अकाऊंट इशित भट्ट किंवा त्याच्या कुटुंबाच्या वतीने चालवले जाते का? याची खातरजमा होऊ शकलेले नाही. अनेकदा एखाद्या प्रसिद्ध होत असलेल्या व्यक्तीच्या नावे अशी फेक अकाऊंट बनवली जात असतात.
मात्र अद्याप या अकाऊंटबाबत सत्यता समोर आली नसली तरी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी जी भाषा वापरली गेली आहे, त्यावर मात्र पुन्हा चर्चा होत आहे. इशित भट केबीसीमध्ये पाचव्या प्रश्नाचे उत्तर देता आले नव्हते. त्यामुळे तो मोकळ्या हातांनी बाहेर पडणार होता. यावेळी तो अमिताभ बच्चन यांच्याकडे फोटोसाठी विनंती करतो. अमिताभही फोटोसाठी लागलीच होकार देतात. सदर संभाषणाचा व्हिडीओ शेअर करत माफी मागण्यात आली आहे.
पोस्टमध्ये काय लिहिले?
या पोस्टमध्ये लिहिले आहे, “सर्वांना नमस्कार, केबीसीमधील माझ्या वागण्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. मी ज्या पद्धतीने बोललो, त्याचे अनेकांना वाईट वाटले. हे जाणून मला वाईट वाटले. मला खरोखरच याबद्दल पश्चाताप वाटतो. त्यावेळी (अमिताभ बच्चन यांच्यासमोर) मी घाबरलो होतो. त्यावेळचे माझे वर्तन पूर्णपणे चुकीचे होते. मला उद्धटपणे वागायचे नव्हते. मी अमिताभ बच्चन सर आणि संपूर्ण केबीसीच्या टीमचा मनापासून आदर करतो.”
पाहा व्हिडीओ –
मला महत्त्वाचा धडा मिळाला
या कथित पोस्टमध्ये पुढे लिहिले, “या अनुभवातून आता मला नम्रपणा आणि जागरूक मनाचा चांगला धडा मिळाला आहे. आपले शब्द आणि कृती यातून आपण कोण आहोत, हे कसे दिसते, याबद्दलही या प्रसंगातून मी शिकलो आहे. यापुढे मी अधिक नम्र, आदराने आणि विचारपूर्वक वागण्याचा प्रयत्न करेन, असे वचन देतो.”
तसेच पोस्टच्या शेवटी त्याने त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. तसेच पोस्टच्या शेवटी स्वतःला ‘द केबीसी बॉय’, असे बिरूद लावले आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत?
इशित भट्टच्या कथित पोस्टवर अनेक युजर्सच्या कमेंट आल्या आहेत. माफी मागण्याच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले आहे. तर काहींनी केबीसीमधील त्याच्या वर्तनाची पुन्हा खिल्ली उडवली. एका युजरने लिहिले, “इशित लहान मुलगा आहे. त्याने चूक केली. जी त्याला आता कळली आहे. त्याने माफी मागितली. त्यामुळे कृपया कुणाच्या बालमनावर आघात होईल, असे काही बोलू नका.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “आपली चूक मान्य करणे, हे मोठ्या मनाचे लक्षण आहे. खूप छान.”