बॉलीवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार अशी सलमान खानची प्रतिमा आता तयार व्हायला हरकत नाही. कारण ईदच्या दिवशी ‘किक’ हा त्याचा चित्रपट प्रदर्शित होऊन आता २७ दिवस म्हणजे जवळपास तीन आठवडय़ांहून अधिक काळ उलटला असला तरी अद्याप त्याच्या चाहत्यांचा प्रेमाचा ‘हँगओव्हर’ पुरता उतरला नसून ‘किक’ने देशात तसेच जगभरात मिळून ३७५ कोटी रुपये इतकी अवाढव्य कमाई केली आहे. साजिद नाडियादवालाचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट कमालीचा यशस्वी ठरल्याने त्याचेही ‘हौसले बुलंद’ झाले आहेत.
जगभरातील तिकीट खिडकीवरील यशाच्या बाबतीत सलमान खानने हृतिक रोशनच्या ‘क्रिश थ्री’ला मागे टाकले आहे. आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाने एकूण ३९५ कोटी रुपये तर शाहरूख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाने ४२२ कोटी रुपये कमाई केली होती तर ‘धूम थ्री’ या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर तब्बल ५४२ कोटी रुपये कमावून आघाडी मिळवली होती.
देशांतर्गत चित्रपटगृहांच्या तिकीट खिडक्यांवर ‘किक’ने प्रदर्शनानंतर चौथ्या आठवडय़ातील शुक्रवारी ५५ लाख रुपये, शनिवारी ६० लाख रुपये तर रविवारी ७५ लाख रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने देशांतर्गत एकूण २३० कोटी ८० लाख रुपये गोळा केले. २५ जुलै रोजी ईदच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करून या चित्रपटाने पाचव्याच दिवशी १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला. १०० कोटी रुपयांची कमाई करणारा सलमान खानचा हा सातवा चित्रपट आहे.
२०१४ च्या सुरुवातीलाच सलमान खानचा ‘जय हो’ हा त्याचा भाऊ सोहेल खान याने दिग्दर्शित केलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु, या चित्रपटाला लोकांचा प्रतिसाद तितकासा लाभला नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा ईदलाच नवीन चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आणि ‘ईद’च्या दिवशी ‘किक’ प्रदर्शित केल्यानेच सलमान खान सुपरहिट ठरला असे मत व्यक्त केले जात आहे. चौथ्या आठवडय़ातही सलमानचे चाहते ‘किक’ला प्रतिसाद देत आहेत.