क्रिती सेनॉन ही बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटातून लोकप्रियता मिळाली आणि आज ती सौंदर्य आणि स्टारडमच्या बाबतीत अनेक मोठ्या अभिनेत्रींशी स्पर्धा करते.

‘मिमी’ चित्रपटासाठी क्रिती सेनॉनला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. यामुळे तिची लोकप्रियता आणि स्टारडम अनेक पटींनी वाढला आहे. क्रिती सेनॉन सध्या चर्चेत आहे, कारण तिने मुंबईतील पॉश पाली हिल परिसरात सी-फेसिंग डुप्लेक्स पेंटहाऊस खरेदी केले आहे.

क्रिती सेनॉनने सुप्रीम प्राण रेसिडेन्शियल टॉवरमधील हे आलिशान पेंटहाऊस ७८.२० कोटी रुपयांना खरेदी केले आहे. द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, क्रितीचे नवीन घर १४ व्या आणि १५ व्या मजल्यावर पसरलेले आहे आणि त्याचे क्षेत्रफळ ६,६३६ चौरस फूट आहे. क्रितीचे हे घर शेवटच्या मजल्यावर आहे. शेवटच्या मजल्याबरोबरच तिला १,२०९ चौरस फूट जागेचा टेरेसदेखील मिळाला आहे. प्रति चौरस फूट किंमत सुमारे १.१८ लाख रुपये आहे आणि या करारात ६ कार पार्किंग स्लॉटदेखील समाविष्ट आहेत. क्रिती आणि तिची आई या मालमत्तेच्या सह-मालक आहेत.

या करारासाठी क्रिती सेनॉनने एकूण ८४.१६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरली आहे, ज्यामध्ये ३.९१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी आणि इतर शुल्क समाविष्ट आहेत. या करारात तिला टेरेसचे अधिकार मिळतात, जिथून अरबी समुद्राचे शानदार दृश्य पाहता येते. क्रिती सेनॉनने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिने २०२३ मध्ये अलिबागमध्ये २००० चौरस फुटांचा प्लॉट खरेदी केला होता. हा परिसर अनेक सेलिब्रिटींना आवडतो. या वर्षाच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांनीही येथे एक प्लॉट खरेदी केला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रितीने २०२४ मध्ये वांद्रे पश्चिमेला ४ बीएचके अपार्टमेंट खरेदी केले होते, ज्याची किंमत ३५ कोटी रुपये होती. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, जावेद अख्तर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, सैफ अली खान आणि रेखा यांसारखे कलाकार वांद्रे पश्चिमेला राहतात.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर क्रिती धनुषबरोबर आनंद एल राय यांच्या ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २८ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २०१३ च्या सुपरहिट चित्रपट ‘रांझणा’चा सिक्वेल आहे. याशिवाय, होमी अदजानियाच्या ‘कॉकटेल २’मध्ये क्रिती ही मुख्य अभिनेत्री म्हणूनही दिसणार आहे. नुकतीच याची पुष्टी झाली आहे. रश्मिका मंदाना देखील या चित्रपटात असणार आहे. हा २०१२ मध्ये आलेल्या सैफ अली खान, डायना पेंटी आणि दीपिका पदुकोण अभिनीत ‘कॉकटेल’ चित्रपटाचा सिक्वेल आहे.