साउथ स्टार समांथा रुथ प्रभू ही ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंटवा’ गाण्यामुळे घराघरांत पोहोचली. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाद्वारे समांथाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले आणि समांथा लोकप्रिय अभिनेत्री ठरली. मध्यंतरी अभिनेता नागा चैतन्यबरोबर झालेल्या घटस्फोटानंतर आणि झालेल्या आजारामुळे समांथा चांगलीच चर्चेत होती. मायोसायटीस हा आजार झाल्यानंतर यावरील उपचारासाठी समांथाने चित्रपटातून ब्रेक घेतला अन् ‘यशोदा’ या चित्रपटातून दमदार कमबॅकही केलं.

आपल्या या आजरपणानंतर समांथा आपल्या तब्येतीच्या बाबतीत फारच जागरूक झालेली असून ती यासंदर्भात एक पॉडकास्ट शोदेखील करते. ‘टेक २०’ नावाच्या या पॉडकास्ट शोच्या नव्या एपिसोडमुळे समांथा सध्या चर्चेत आहे. समांथाच्या या पॉडकास्टच्या नव्या एपिसोडमध्ये अलकेश नावाच्या एका तरुणाने हजेरी लावली. या भागात त्यांनी तब्येतीबद्दल, लोकांच्या जीवनशैलीबद्दल तसेच यकृताच्या कार्याबद्दल भाष्य केलं आहे. लिवर डिटॉक्सबद्दल या एपिसोडमध्ये दोघांनी भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : गरोदर असल्याने एका प्रसिद्ध शोमधून नेहा धुपियाला देण्यात आलेला डच्चू; अभिनेत्रीने शेअर केली कटू आठवण

या भागात अलकेश म्हणाला, की बऱ्याच जडी-बुटींच्या माध्यमातून यकृताचे आरोग्य सुधारता येतं तसेच त्याची कार्यक्षमताही वाढवण्यात येते. या गोष्टीला दुजोरा देण्यासाठी त्याने ‘डेंडेलॉइन’ म्हणजेच पिवळ्या रंगाच्या रानटी फुलांचा आधार घेतला. या फुलांच्या सेवनाने यकृत तंदुरुस्त राहायला मदत होते असं त्याने या व्हिडीओमध्ये म्हंटलं आहे. अलकेशच्या याच वक्तव्यावर डॉक्टर अॅबी फिलिप्स यांनी आक्षेप घेतला आहे. ते एक लिव्हर स्पेशालिस्ट आहेत अन् त्यांनी त्यांच्या ‘द लिवर डॉक’ या एक्स हॅंडलच्या माध्यमातून समांथाच्या या पॉडकास्टमधील व्हिडीओ शेअर करत त्यांची पोलखोल केली आहे.

ते आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहितात, “ही समांथा रूथ प्रभू आहे. ही एक फिल्मस्टार आहे. समांथा ‘लिवर डिटॉक्स’ याविषयी चुकीची माहिती देऊन ३ कोटी फॉलोअर्सची दिशाभूल करत आहे. या पॉडकास्टमध्ये आरोग्यासंबंधी फारशी माहिती नसलेला ‘वेलनेस कोच आणि परफॉर्मन्स न्यूट्रिशनिस्ट’ने सहभाग घेतला आहे ज्याला कदाचित मानवी शरीर नेमके कसं काम करते हेदेखील ठाऊक नाहीये. मला विश्वास बसत नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर असलेले स्टार सर्वात वाईट, विज्ञानाच्या बाबतीत अशिक्षित लोकांना ‘हेल्थ पॉडकास्ट’ वर आरोग्याबद्दल बोलण्यासाठी आमंत्रित कसे करतात? या लोकांचा प्रत्यक्षात वैद्यकीय क्षेत्राशी, विज्ञानाशी काडीमात्र संबंध नसतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते लिहितात, “या पॉडकास्टवर आलेला वेलनेस कोच याचा वैद्यकीय क्षेत्राशी दुरापास्त संबंध नाही. कदाचित त्याला यकृत नेमकं काय काम करतं हेदेखील धड ठाऊक नसावं. यकृत तंदुरुस्त राहण्यासाठी त्याने ‘डेंडेलॉइन’ हे सर्वात उत्तम असल्याचा दावा केला आहे. मी स्वतः लिवरचा डॉक्टर आहे अन् एक प्रशिक्षित रजिस्टर्ड हेपेटोलॉजिस्ट आहे जो गेल्या दशकापासून या क्षेत्रात कार्यरत आहे. यकृताच्या समस्या असणाऱ्या बऱ्याच रुग्णांवर मी उपचार केले आहेत. मी हे नक्कीच खात्रीने सांगू शकतो या पॉडकास्टमध्ये सांगितलेली गोष्ट ही बीनबुडाची अन् धादांत खोटी आहे.” अद्याप डॉक्टर फिलिप्स यांच्या या पोस्टवर समांथा किंवा अलकेश या दोघांपैकी कुणीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या एका पोस्टमुळे नेटकरी समांथावर चांगलेच खवळले आहेत.