ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मातीचा सुगंध दरवळू लागल्यानंतर पाऊस खुणावू लागतो. खरंतर प्रत्येक जण पाऊस वेगवेगळ्या प्रकारे अनुभवत असतो. कोणी आठवणींमध्ये रमतो, तर कोणी देहभान विसरून मनसोक्तपणे भिजतो. मुसळधार पाऊस बरसल्यानंतर अनेकांची पावले वाफाळलेला चहा पिण्यासाठी, गरमागरम भजी खाण्यासाठी आणि समुद्रकिनारी मनसोक्तपणे भिजण्यासाठी वळतात. तर अनेकांच्या घरी चहा आणि भजीसह गप्पांचा फड रंगतो, मात्र मुसळधार पावसात अनेकांबरोबर भन्नाट किस्सेही घडतात आणि अडचणीतून आठवणीही निर्माण होतात. कलाकारांच्या आयुष्यातही विविध कार्यक्रम, चित्रीकरण व तालमीदरम्यान पडलेला पाऊस एक वेगळा अनुभव आणि आठवणी देणारा ठरतो. या मुसळधार पावसातील आठवणी कलाकारांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितल्या आहेत.
पावसाळा आणि माझे नाव…
माझा जन्म पावसाळ्यातील जुलै महिन्यात असल्यामुळे पावसाशी माझे खास नाते आहे. सावन म्हणजेच श्रावणात जन्म झाल्यामुळे माझे नाव ‘सावनी’ ठेवण्यात आले. त्यामुळे माझे नावच पावसाशी निगडित आहे, तर माझ्या नावाचा दुसरा अर्थ हा शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. परंतु, विरोधाभास असा आहे की मला पाऊस अजिबात आवडत नाही. मला पावसात भिजायला, चिखल व साचलेल्या पाण्यातून चालायला आणि पावसाच्या दरम्यान होणारी वर्दळ व वाहतूक कोंडी अजिबात आवडत नाही. पाऊस हा खिडकीतून डोकावून अनुभवण्यातही एक वेगळी मजा आहे. पावसात निसर्गाचे सुंदर रूप पाहायला मिळते. मी मूळची कोकणातील असल्यामुळे कोकणातील सुंदर व अवर्णनीय पाऊस अनुभवला आहे. मला पावसाची गाणी ऐकायला व गायला आवडतात. पावसाच्या निमित्ताने वेगवेगळी गाणी गायला मिळणे, हासुद्धा एक वेगळा आनंद आहे. पण पाऊस विशेष आवडत नाही. अनेकदा पावसामुळे खुल्या मोकळ्या जागेत असणारे नियोजित सांगीतिक कार्यक्रम रद्द झालेले आहेत. तर खुल्या मैदानावर सांगीतिक कार्यक्रम सुरू असताना अनपेक्षितपणे पाऊस पडल्यानंतरही रसिक प्रेक्षक जागेवरचे उठलेले नाहीत, असेही कार्यक्रम बऱ्याचदा अनुभवलेले आहेत.- सावनी रवींद्र, गायिका
मुसळधार पाऊस, नाटकाचे वाचन आणि वडापाव
‘नवा गडी, नवं राज्य’ हे नाटक २००९-१० साली केले होते. माझ्यासह उमेश कामत, प्रिया बापट होते. या नाटकाचे पहिले वाचन एकेदिवशी सायंकाळी पुण्यातील पाषाण रोड येथील माझ्या घरी ठेवले होते. मात्र तेव्हा ढगफुटी होऊन प्रचंड पाऊस कोसळत होता. टेकडीवरील ओढ्यावरून प्रचंड प्रवाहात पाणी आले आणि तळमजल्यावरील घरांमध्ये पाणी शिरले, माझ्या इमारतीचीही संरक्षक भिंत कोसळून आतमध्ये पाणी शिरले, काही जण वाहूनही गेल्याचे कळले. नाटकाच्या वाचनासाठी जमलेल्या मंडळींच्याही गाड्या पाण्यात तरंगत होत्या. आम्ही पहिल्या मजल्यावर राहात असल्यामुळे घरात पाणी शिरण्याचा प्रकार आमच्याबाबतीत घडला नाही. त्यामुळे नाटकाचे वाचन सुरू होते. बाहेर प्रचंड पाऊस आणि रात्रही झाल्यामुळे कोणी घरी जाऊ शकत नव्हते. आम्ही वाचन पूर्ण केले, मात्र या सगळ्या वातावरणात वाचनासाठी जमलेल्या सर्वांनी माझ्या आईकडे वडापावची शिफारस केली. तेव्हा आमच्यातील काही जणांनी मुसळधार पावसातही बाहेर जाऊन पाव आणण्याची हिंमत केली. त्यानंतर सर्वांनी वडापावचा आस्वाद घेतला आणि गप्पाही रंगल्या. तेव्हा आम्ही बाहेर अडकलेल्या माणसांना मदतही केली होती, हा प्रसंग कायम लक्षात राहणारा आहे.-हेमंत ढोमे, अभिनेता, दिग्दर्शक
शाळेतील मजा न्यारी आणि २६ जुलै २००५ ची ‘ती’ आठवण
पावसाळा सुरू झाला की शाळा सुरू होण्याची चाहूल लागायची आणि नवीन छत्री, रेनकोट व गमबूट घेण्याचा उत्साह असायचा. आता आपल्याकडे चार ते पाच छत्र्या असतात, मात्र शाळेत घेऊन जाण्याच्या छत्रीचे कौतुकच वेगळे असायचे. विभागातील काही विशिष्ट चार ते पाच दुकानात आमच्या शाळेतील मित्रमंडळी छत्री घ्यायला जमायचे आणि आपली छत्री इतरांपेक्षा चांगली आहे का? मैत्रिणीच्या छत्रीचा रंग कोणता? मित्रमंडळींच्या छत्रीसारखा माझ्या छत्रीचा रंग नको, या सर्व गोष्टी पाहण्यातही एक वेगळी मजा असायची. माझी शाळा दुपारची असायची. मात्र दुपारी शाळा भरल्यानंतर जेव्हा मुसळधार पावसाला सुरूवात व्हायची, तेव्हा तास सुरू असताना ‘पावसामुळे घरी लवकर सोडण्यात येणार आहे’, असे सांगितल्यावर एक वेगळाच आनंद वाटायचा. या शाळेतील आठवणी आजही मनात ताज्या आहेत. २६ जुलै २००५ रोजी मुंबईत पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला होता आणि याच दिवशी दहिसर येथे आमच्या एका मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. तेव्हा माझ्यासोबत दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर मालिकेत होते.
मी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ राहायचे आणि तेव्हा त्या ठिकाणची नदी दुथडी भरून वाहात होती, दुकानांमध्येही पाणी गेले होते. तेव्हा दुपारी तीन वाजताच्या दरम्यान आमचे चित्रीकरण संपले होते, मात्र त्याच दरम्यान मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली होती. सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे आनंद अभ्यंकर यांनी मला घरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही निघालो. रस्त्यावर प्रचंड पाणी साचल्यामुळे माझ्या घरापर्यंत गाडी पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे त्या ठिकाणी जवळपास ‘अशोकवन’ येथे राहणाऱ्या माझ्या मावशीकडे दादांनी सोडले. मात्र मावशी तळमजल्यावर राहत असल्यामुळे तिच्या घरात सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान अक्षरश: मानेपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे तिच्या इमारतीतील सर्व जण गच्चीवर येऊन जमले होते आणि मग आम्ही पहाटे गच्चीवरून खाली उतरलो. तर तेव्हा मावशीच्या घरातील फ्रिज व टीव्ही एकीकडे, भांडी व बेड दुसरीकडे अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे २६ जुलै २००५ रोजीचा पाऊस आणि हा अनुभव कधीच विसरू शकत नाही.-श्रेया बुगडे, अभिनेत्री
चित्रीकरणाचा दिवस पावसाळी सहलीला घेऊन गेला
आम्ही काही वर्षांपूर्वी मढ आयलंड येथे एका मालिकेचे चित्रीकरण करीत होतो. तेव्हा नियमित वेळापत्रकाच्या पलीकडे जाऊन बाहेर चित्रीकरण करायचे ठरले. मुंबईतील पाऊस अचानकपणे कधी मुसळधार, तर कधी रिमझिम पडत असतो. त्यामुळे चित्रीकरणाच्या दिवशी नेमका कसा पाऊस असेल, या गोष्टीचा अंदाज येत नव्हता. पाऊस आल्यावर तारांबळ उडू नये, यासाठी सकाळी ७ वाजता गोरेगाव चित्रनगरीत चित्रीकरण करायचे निश्चित झाले. मात्र जेव्हा जेव्हा आम्ही एखाद्या प्रसंगाचे चित्रीकरण करायला घ्यायचो, नेमका तेव्हाच पाऊस पडायचा. त्यानंतर पुन्हा व्हॅनिटी व्हॅनमध्ये येऊन बसायचो. मग पाऊस थांबला किंवा थोडासा रिमझिम पडायचा, तेव्हा चित्रीकरणासाठी बाहेर यायचो. मात्र जेव्हा चित्रीकरण करायला सुरुवात व्हायची, नेमका तेव्हाच पाऊस पडायचा. मग पुन्हा व्हॅनिटी व्हॅनमध्ये यावे लागत होते. हा प्रकार दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होता. त्यामुळे मग जेवायचा निर्णय घेतला आणि पुन्हा दुपारी ३ वाजता चित्रीकरणाला सुरुवात केली. मात्र एक प्रसंग चित्रित झाल्यानंतर अवघ्या १० मिनिटांनी पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली. आमच्या छत्र्या आणि चित्रीकरणस्थळी लावलेली ताडपत्री काहीही टिकले नाही. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाऊस पडतच होता. त्यामुळे आमचे चित्रीकरण थांबले आणि सेटवर पावसाळी धमाल सुरू झाली. कोणी गरमागरम भजी बनवून खात होते, तर कोणी चहा बनवून पीत होते. काहींनी पिठलं भाकरीचाही आस्वाद घेतला. एकप्रकारे आमची पावसाळी सहलच झाली. त्यानंतर ६.३० वाजता चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे आम्हाला गोरेगाव चित्रनगरीत संबंधित प्रसंग चित्रित करता आलाच नाही. त्यामुळे हा प्रसंग आम्ही इनडोअरच चित्रित करण्याचा निर्णय घेतला. मला पावसाळ्यात सह्याद्रीसह कोकणातील विविध ठिकाणी फिरायला प्रचंड आवडते आणि हा एक वेगळा अनुभव असतो.-सुयश टिळक, अभिनेता