मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉस मराठीकडे पाहिले जात आहे. विविध क्षेत्रातील १६ कलाकार घेऊन यंदा बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सज्ज झाले आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या कार्यक्रमाची थीम ALL IS WELL अशी असणार आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच लोकप्रिय ठरतो. ‘बिग बॉस’चे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर येत्या २ ऑक्टोबरपासून चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने नुकतंच महेश मांजरेकरांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी बिग बॉस बद्दल भाष्य केले.

छोट्या पडद्यावरील सर्वांचा लाडका आणि वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ला ओळखले जाते. हा शो कायमच लोकप्रिय असतो. मराठी बिग बॉस सुरु झाल्यापासून हा शो नेहमीच सुपरहिट ठरला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महेश मांजरेकर हे बिग बॉसचे सूत्रसंचालन करणार आहेत. फक्त मराठीच नव्हे तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे, मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नुकतंच एका मुलाखतीत त्यांना तुम्ही बिग बॉसचा एक एपिसोड किती वेळा पाहता असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फार हटके पद्धतीने उत्तर दिले.
आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कोणते स्पर्धक बघायला आवडतील? महेश मांजरेकर म्हणाले “गौरव मोरे, शिवाली…”

महेश मांजरेकर काय म्हणाले?

“प्रेक्षक जे बिग बॉसचा एपिसोड पाहतात तोच मी पाहतो. कारण जर मी त्यावेळी काही वेगळं बोललो तर मी काय बोलतोय हे प्रेक्षकांना समजणार नाही. त्यामुळे प्रेक्षक हा काय वेगळं बोलतोय, असे म्हणत रिअॅक्ट करतील. यात फरक इतकाच आहे की प्रेक्षक फक्त एक एपिसोड एकदाच पाहतात आणि मी तो दोन वेळा पाहतो. यावेळी दुसऱ्यांदा तो भाग बघताना मला कुठे, कशावर बोलायचं आहे हे समजतं, त्याची मी एक खास नोंदही ठेवतो.

एखाद्या घरात कायमच भांड्याला भांड लागत असतं. प्रेमविवाह झालेली जोडपी महिन्यातून दोनवेळा तरी भांडतात. त्यानुसारच स्पर्धकांना एखादा खेळ कसा खेळायचा हे कळलं की ते त्यावर रिअॅक्ट होतात आणि मग भांडणं होतात. त्यांच्यात होणारी भांडणं ही कधी कॅप्टनसीसाठी तर कधी जिंकण्यासाठी असते. भांडणाला पर्याय नाही. ती चालत राहणार. या खेळात प्रत्येक स्पर्धक वेगवेगळ्या पद्धतीने खेळत असतो. मला त्यांना ते टास्क द्यायला आवडतं. त्यामुळे अनेक महिने प्रेक्षक या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत असतात”, असे महेश मांजरेकरांनी सांगितले.

आणखी वाचा : अनिकेत विश्वासराव एक्स पत्नीसह झळकणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरात, चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आता या बिग बॉस मराठीमध्ये कोण कोणते कलाकार असणार, पुन्हा तोच राडा होणार का? मैत्री आणि प्रेमाचे वारे वाहणार का? याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरु होणार आहे. त्यातच ‘बिग बॉस मराठी’मुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होणार असल्याचे दिसत आहे. यात सहभागी होणारे स्पर्धक कोण असणार याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.