तामिळ अभिनेता मन्सूर अली खानच्या मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. त्यामागचं कारण म्हणजे त्याने अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल केलेलं वादग्रस्त विधान होय. त्याने अभिनेत्रीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं, नंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली आणि डीजीपींना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी मन्सूर अली खानला समन्स पाठवले. समन्स पाठवताच त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्रिशाची माफी मागितली. पण आता मात्र त्याने यु-टर्न घेतला आहे.
मन्सूर अली खानने त्रिशाविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. ‘न्यूज १८’ शी बोलताना अभिनेत्याने सांगितलं की आज (मंगळवारी) त्याचे वकील या खटल्यातील सर्व तपशील लोकांसमोर उघड करतील. मानहानीचा खटला काय आहे आणि त्यामागील कारण काय असं विचारल्यावर मन्सूर म्हणाले, “मी आता तपशील शेअर करू शकत नाही. माझे वकील आज दुपारी ४ वाजता याबाबत सर्व खुलासा करतील.”
दरम्यान त्रिशाची माफी मागितल्याबद्दल विचारलं असता माफी मागणं हा फक्त विनोद होता आणि मी हे सर्व नंतर समजावून सांगेन, असं विधान मन्सूर अली खानने केलं. अभिनेत्याने आधी त्रिशाची माफी मागण्यास नकार दिला होता. पण पोलिसांनी समन्स पाठवल्यावर त्याने माफी मागितली, नंतर त्रिशानेही पोस्ट करत माफी स्वीकारली होती. हा विषय इथेच संपला असं वाटत असताना आता अभिनेत्याने मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे, त्यामुळे हे प्रकरण आणखी वाढणार असं दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय?
त्रिशा व मन्सूरने ‘लिओ’ चित्रपटात काम केलं होतं, पण त्यांचे एकत्र सीन नव्हते. त्यावरून तो म्हणाला होता, “जेव्हा मी त्रिशाबरोबर काम करतोय, असं ऐकलं तेव्हा मला वाटलं की चित्रपटात बेडरूमचा सीन असेल. मला वाटलं मी तिला बेडरूममध्ये घेऊन जाईन. जसे मी माझ्या आधीच्या चित्रपटात इतर हिरोईनबरोबर केले होते. मी अनेक चित्रपटांमध्ये रेप सीन केले आहेत. हे माझ्यासाठी नवीन नाही. पण या लोकांनी मला काश्मीर शेड्यूलमध्ये त्रिशाला पाहूही दिले नाही.” त्याच्या या वक्तव्यानंतर त्रिशाने संताप व्यक्त केला होता.
मन्सूर अली खानचे विधान लिंगभेद करणारे, अपमानास्पद, घृणास्पद आणि वाईट होते. यापुढे आपण कधीही त्याच्याबरोबर काम करणार नाही, असं त्रिशाने जाहीर केलं होतं.