पावसाळ्यामुळे डांबरासकट धुऊन निघालेल्या रस्त्यांवरून प्रवास करायचा म्हटलं की, वाहनचालकासह प्रवास करणाऱ्यांची हाडं खिळखिळी होणं आलंच. रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाकार सोशल मीडियाद्वारे यावर व्यक्त होत आहेत. आता अभिनेता चिन्मय मांडलेकरने फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत ‘अज्ञानी माणसाचे प्रश्न’ उपस्थित केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात राहणारा एक सामान्य नागरिक म्हणून मला काही सामान्य प्रश्न पडले आहेत असं म्हणत चिन्मयने या व्हिडीओच्या माध्यमातून राजकारण्यांवर जळजळीत टीका केली आहे. ”पहिला प्रश्न म्हणजे, २०१९ सालीसुद्धा आम्हाला रस्ते बरे द्या यासाठी गयावया का करावी लागतेय? आपण विकासाच्या गप्पा ऐकतोय, कशी आपली प्रगती होणार आहे, होत आहे, याच्याबद्दल मी रोज पेपरमध्ये रकानेच्या रकाने जाहिराती बघतोय, मग माझा प्रश्न असा आहे की आम्ही ज्या रस्त्यांवरून सुखकर प्रवास करू शकतो, असे रस्ते आम्हाला का मिळत नाहीत,” असा सवाल त्याने केला आहे.

”माझा दुसरा प्रश्न, रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक टाकण्याची कल्पना कुठल्या महाभागानं शोधून काढली? मी खूप अज्ञानी माणूस आहे, मला काहीच कळत नाही, पण मला जेवढं कळतं त्यानुसार पेव्हर ब्लॉक ही जी गोष्ट आहे, ती फुटपाथसाठी वापरली जाते. कारण एखादा जड वाहनं जेव्हा पेव्हर ब्लॉकवरून जातं, तेव्हा बऱ्याचदा तो उखरला जातो किंवा तो उडून मागच्या वाहनावर पडतो. माझ्या गाडीवर उडालेल्या पेव्हर ब्लॉकचे बरेच मार्क आहेत. जर मी चारचाकीऐवजी दुचाकीवर असतो तर हाच पेव्हर ब्लॉक प्राणघातक ठरला असता. त्यामुळे पेव्हर ब्लॉक जे सामान्यांसाठी आहेत की त्या कंत्राटदारासाठी आहे, जे दर वीस दिवसांनी रस्त्याचं काम काढतात. कारण पेव्हर ब्लॉकने खड्डे भरले जातात, ते पुन्हा वीसएक दिवसांनी उखरले जातात आणि पुन्हा वीस दिवसांनी तिथे काम करणारी माणसं दिसतात. मग ते पैसे कोण खातोय आणि कोणाचा फायदा होतोय,” असं तो पुढे म्हणाला.

या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने सामान्यांनाही हे प्रश्न उपस्थित करण्याचं आवाहन केलं आहे. ”मला असं वाटतं आता हे प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना, राजकारण्यांना जे स्वत:ला आपले सेवक म्हणवतात, हा खूपच विरोधाभास आहे, पण यांना विचारण्याची आता वेळ झालीये, कारण हे खूप अती झालंय. बरं हे लोकं कुठल्या रस्त्यांनी प्रवास करतात, मला माहीत नाही. कारण त्यांना खड्डे लागत नाहीत. माझ्यासारखे अनेक अज्ञानी माणसं या मुंबई, वाशी, ठाणे, डोंबिवली या शहरांमध्ये राहतायत, मला असं वाटतं या अज्ञानी माणसांनीसुद्धा आता सोशल मीडियाद्वारे का होईना आपलं अज्ञान दूर करण्यासाठी हे प्रश्न विचारले पाहिजेत. कारण मला कुठलाही राजकीय नेता, सत्तेतले तर बोलतच नाहीत पण विरोधी पक्षाचेसुद्धा हे प्रश्न परखडपणे मांडताना दिसत नाहीये. आपणच विचारूया प्रश्न, कदाचित आपलेच प्रश्न आपल्याला सोडवण्याची पाळी येणार आहे”, अशा शब्दांत त्याने प्रशासनावर तसंच राजकीय नेत्यांवर ताशेरे ओढले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor chinmay mandlekar post video on fb about potholes on roads ssv
First published on: 18-09-2019 at 12:53 IST