अभिनेता क्षितिश दाते आणि ऋचा आपटे हे दोघेही नुकतेच लग्नबंधनात अडकल्याचं समजत आहे. अर्थात त्यांनी अगदी शांततेत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या काही मित्रमंडळींनी आज त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अनेक कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती मिळत आहे. ‘सांग तू आहेस ना’ मालिकेत दिसणारी अभिनेत्री शिवानी रांगोळे, अभिनेता शिवराज वायचळ, अक्षय वाघमारे यांनी इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत या दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर या दोघांना शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र या दोघांनीही अद्याप आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काहीही माहिती दिलेली नाही.


गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात या दोघांनी साखरपुडा केला होता. त्याबदद्लही दोघांनी एका वर्षानंतर सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत माहिती दिली होती. त्यावरही त्यांच्या चाहत्यांनी आणि मित्रमंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋचा आणि क्षितिश ह्या दोघांनीही अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्येही काम केलं आहे. क्षितिशची ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातली गण्या ही भूमिका प्रचंड गाजली. आता तो लवकरच ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातही दिसणार आहे. हे दोघेही ‘बन मस्का’ या मालिकेत एकत्र दिसले होते. तर ऋचा सध्या ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत काम करत आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेच्या काही भागांमध्येही ती दिसली होती. तसंच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतही तिने कुस्ती प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.