मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी निर्माण करणारा अभिनेता म्हणून श्रेयस तळपदेला ओळखले जाते. श्रेयस तळपदे हा सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशची भूमिका साकारत आहे. या मालिकेद्वारे त्याने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. सध्या घराघरात गणेशोत्सवानिमित्ताने भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. श्रेयस तळपदेने त्याच्या गणेशोत्सवादरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नुकतंच त्याने तो घरातल्या गणपती बाप्पाचं विसर्जन का करत नाही? याबद्दल भाष्य केले आहे.

श्रेयस तळपदेने नुकतंच ‘न्यूज १८ लोकमत’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने त्याच्या गणेशोत्सवादरम्यानच्या आठवणी सांगितल्या आहेत. यात तो म्हणाला, मी जेव्हा नवीन घर घेतलं तेव्हा आम्ही घरी बाप्पाचं आगमन करायचं, असं ठरवलं होतं. आम्ही सलग सात वर्ष दीड दिवसांचे बाप्पा घरी आणले. त्यानंतर मधल्या काळात माझे बाबा वारले. तेव्हा मी फार चिडलो होतो. ज्या पद्धतीनं सगळं झालं ते माझ्यासाठी फार धक्कादायक होतं. त्यामुळे मी चिडून यापुढे घरी गणपती बसवायचा नाही, असे सांगितलं.

आणखी वाचा : ‘धर्मवीर’ चित्रपट आणि महाराष्ट्रातील सत्तांतराचा खरोखर काही संबंध आहे का? प्रसाद ओक म्हणाला “हा सत्तापालट…”

“त्यानंतर मला मुलगी झाली. तिने घरी गणपती बाप्पांना आणूया असा हट्ट केला आणि तिच्या हट्टापुढे आम्ही गेल्या वर्षीपासून पुन्हा एकदा गणपती बाप्पा आणायला सुरुवात केली. पण माझ्या घराच्या बाप्पाचे आम्ही कधीच विसर्जन करत नाही. याचे कारणही फार खास आहे.”

“मुलगी झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा बाप्पाला घरी आणलं. त्यानंतर बाप्पाच्या विसर्जनाच्या काही तास आधी तिने शेजाऱ्यांकडील गणपती बाप्पाचे विसर्जन पाहिले. दुसरीकडे आम्ही बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी हौद तयार केला होता. त्यावेळी ती आली आणि म्हणाली, डॅडा आपण बाप्पाचं विसर्जन करायचं नाही. आम्ही तिला समजावलं पण तेव्हा तिने प्रचंड गोंधळ घातला. यानंतर आम्ही घराच्या बाप्पाचं विसर्जन करायचं नाही असं ठरवलं”, असे श्रेयस तळपदे म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मात्र विसर्जनाच्या दिवशी आम्ही बाप्पांच्या पायाला माती लावून त्या मातीचं विसर्जन करतो आणि मूर्ती घरीच ठेवली जाते. त्या मुर्तीला दरवर्षी रंगरंगोटी करुन पुन्हा त्याच मूर्तीची पूजा करतो. विशेष म्हणजे माझी लेक घरी ठेवलेल्या त्या बाप्पाला दररोज ‘गुड मॉर्निंग, बाप्पा गुड नाइट बाप्पा असे म्हणते.” असेही श्रेयस तळपदेने सांगितले.