रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुखच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. सिनेमागृहांत या चित्रपटाचे शो हाऊसफूल होत होते. काही दिवसांपूर्वीच ‘वेड’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.
हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेला ‘वेड’ चित्रपट बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने पाहिल्यानंतर तो भारावून गेला आहे. ‘वेड’ पाहिल्यानंतर त्याने रितेश देशमुखचं कौतुक केलं आहे. अभिषेक बच्चनने वेडबाबत इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने ‘वेड’ चित्रपट पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
“डिस्ने प्लस हॉटस्टारवर वेड चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये पाहू शकता. रितेश देशमुख व जिनिलीया तुम्ही चांगलं काम केलं आहे,” असं अभिषेक बच्चनने इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे. अभिषेकची ही स्टोरी रितेशने शेअर करत त्याचे आभार मानले आहेत.

हेही वाचा>> “मुंबई-महाराष्ट्रात…”, प्राजक्ता माळीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली…
दरम्यान, ‘वेड’ चित्रपटात रितेश देशमुख व जिनिलीया मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. तर जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. बऱ्याच वर्षांनंतर जिनिलीया व रितेश पुन्हा एकत्र पडद्यावर दिसल्याने चाहतेही आनंदी होते.