मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकताच तिचा ‘लंडन मिसळ’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील ऋतुजाच्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. सोशल मीडियावर ऋतुजा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे व्हिडीओ, फोटो शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. ‘लंडन मिसळ’ चित्रपटाच्या निमित्ताने ऋतुजाने सोशल मीडियावर एका खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा- “मला अशी सासू हवी…”, रिंकू राजगुरुने लग्नापूर्वीच सांगितली अपेक्षा, म्हणाली “माझं लग्न…”

‘लंडन मिसळ’ हा चित्रपट ऋतुजासाठी खूप खास आहे, कारण मुख्य अभिनेत्री म्हणून ऋतुजाचा हा पहिलाच चित्रपट आहे. दरम्यान, या संदर्भातच ऋतुजाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं की, “काल मी स्वत:ला प्रथमच एका मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत पाहिलं. नकाराला मी घाबरत नाही किंवा नकार मी मनालाही लावून घेत नाही. पण, एका चित्रपटाला मिळालेला नकार आणि मग आपण चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्यास सक्षम नाही का? अशी माझ्या मनात शंका निर्माण झाली. मुख्य भूमिकेत दिसणं हे खरंतर माझं स्वप्न कधीच नव्हतं, पण आपण चित्रपटाची नायिका होऊ शकत नाही, ह्याची जाणीव करून दिल्यावर मात्र माझ्या स्वभावानुसार मनात आलं की हे करायलाच हवं. “ज्यांनी नायिका होण्याचे स्वप्न माझ्या मनात पेरल्याबद्दल त्यांचे आभार”, असं म्हणत तिने चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्मात्यांचे आभार मानले आहेत.

पुढे ऋतुजाने लिहिलं “मला अजून खूप शिकायचं आहे. खूप प्रवास कारायचा आहे. अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. पण माझ्या या प्रवासाला सुरुवात झाली असल्याचा मला आनंद व अभिमान आहे.” ऋतुजाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत ऋतुजाचे अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा-“उप्या तो चित्रपट पाहून…”, उपेंद्र लिमयेंना ‘अ‍ॅनिमल’ पाहून संदीप पाठकचा आला फोन; म्हणाले, “अर्धा तास…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली. आपल्या अभिनयाच्या जोरावर ऋतुजाने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नाटक, मालिका चित्रपटांच्या माध्यमातून ऋतुजा प्रेक्षकांच मनोरंजन करत आली आहे. आता नुकताच तिचा ‘लंडन मिसळ’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर भरत जाधव गौरव मोरे, रसिका क्षोत्री, माधुरी पवार, अभिनेता गौरव मोरे, निखिल चव्हाण, ऋतुराज शिंदे, सुनील गोडबोले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात लंडनमध्ये मिसळचं हॉटेल उभं करण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या दोन बहिणींची कथा बघायला मिळत आहे.