रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ८०० कोटींचा गल्ला जमावला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी, शक्ती कपूर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या प्रमुख कलाकारांशिवाय मराठी अभिनेते उपेंद्र लिमये यांनी ‘अ‍ॅनिमल’मध्ये शस्त्रासाठा पुरवणाऱ्या डिलरची लहानशी पण दमदार भूमिका साकारली आहे. चित्रपटातील त्यांची एन्ट्री, त्यांचे मराठी संवाद आणि त्यानंतर वाजणारं “डॉल्बीवाल्या…” हे गाणं या सगळ्याची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपट पाहायला जाणारे सगळे प्रेक्षक उपेंद्र लिमयेंनी साकारलेल्या फ्रेडी या भूमिकेचा आनंद लुटत असल्याचं व्हायरल व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. चित्रपटात फ्रेडीच्या भूमिकेसाठी मराठीत संवाद व गाणं वापरण्यामागचं नेमकं काय कारण आहे याविषयी उपेंद्र लिमयेंनी लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत खुलासा केला आहे. ते म्हणाले, “संदीपने यापूर्वी माझी अनेक कामं पाहिली होती. त्यामुळे फ्रेडीची भूमिका मी करावी अशी त्याची मनापासून इच्छा होती. शस्त्रसाठा पुरवणारं पात्र चित्रपटात मराठी असेल हे संदीपने आधीच ठरवलं होतं. त्यामुळे त्या भूमिकेची मराठी पार्श्वभूमी पाहून त्यानुसार संवाद घेण्यात आले.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे कॉलेजमध्ये असताना झालेला नापास; किस्सा सांगत म्हणाला, “परीक्षेचे विषय…”

उपेंद्र लिमये पुढे म्हणाले, “फ्रेडी पाटीलच्या भूमिकेचा स्वभाव कसा असेल हे मला संदीपने आधीच सांगितलं होतं. पण, ऑनस्क्रीन काम करताना त्यात मी बऱ्याच नवीन गोष्टी जोडल्या. फ्रेडी हा साधा डिलर नसून मोठमोठी शस्त्र पुरवतो आणि एकंदर त्या भूमिकेचा अ‍ॅटिट्यूड पाहता त्याचे संवाद मराठीत ठेवण्यात आले. याशिवाय चित्रपटात मी जो तोंडाने आवाज काढलाय ती गोष्ट प्रत्यक्ष स्क्रिप्टमध्ये नव्हती. संदीपला विचारून मी ती अ‍ॅडिशन घेतली होती. तो आवाज काढण्यामागचा माझा नेमका हेतू काय आहे हे मी त्याला पटवून दिलं होतं. माणसं खूप चिडतात तेव्हा असं वागू शकतात (तोंडाने आवाज) हे आम्हाला त्यातून दाखवायचं होतं.”

हेही वाचा : अनुष्का शर्माच्या भावानंतर ‘अ‍ॅनिमल’फेम तृप्ती डिमरी श्रीमंत उद्योगपतीला करतेय डेट? ‘या’ फोटोमुळे अफेअरच्या चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“संदीपला सुद्धा माझं म्हणणं पटलं आणि अशाप्रकारे फ्रेडी पाटील आम्ही साकारला. त्या सीनचं शूटिंग पूर्ण झाल्यावर ब्रेकमध्ये सेटवरचे आमचे सगळे सहकारी मी सीन केल्याप्रमाणे तोंडाने आवाज काढत होते. तेव्हाच आम्हाला समजलं हे वर्क नक्की होणार” असं उपेंद्र लिमयेंनी सांगितलं. दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या १ हजार कोटींच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे.