Bharat Jadhav on Friendship with Kedar Shinde: लोकप्रिय अभिनेते भरत जाधव लवकरच शिवराज वायचळ दिग्दर्शित ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात त्यांच्याबरोबर आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधवदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांना एका वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
केदार शिंदे व अंकुश चौधरीबरोबरच्या मैत्रीबाबत भरत जाधव काय म्हणाले?
भरत जाधव यांनी नुकतीच ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ या चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अंकुश चौधरी व केदार शिंदे यांच्याबरोबर असलेल्या मैत्रीबाबत वक्तव्य केले. “मी शाहीरांकडे १९८५ ला लोकधारामध्ये जॉईन झालो. केदार खूप लहान होता. १९८५-८६ ला केदार व माझी ओळख झाली. त्यावेळी केदार मला भरत दादा अशी हाक मारत असायचा. त्याच्या आणि माझ्या वयात ७ वर्षांचा फरक आहे. मात्र, भरत दादाचा भरत्या कधी झाला, हे मला आणि त्यालाही कळलं नसेल. पण, केदार छान लिहायचा.”
पुढे भरत जाधव म्हणाले, “अंकुश व केदार एका शाळेत, एका वर्गातले आहेत. मग आम्ही गप्पा-गप्पांमध्ये एकांकिका करूयात, असं ठरवायला लागलो. मग आम्ही शाहीर साबळे प्रतिष्ठानच्या नावाने एकांकिका स्पर्धा करायला लागलो. मग कळलं की आपण खुल्या एकांकिका करण्यापेक्षा कॉलेजअंतर्गत स्पर्धा करायला पाहिजेत. मग कुठलं तरी कॉलेज पाहिजे होतं.
“कॉलेज असं पाहिजे होतं की तिथे आपल्याला प्रमुख भूमिका मिळायला हवी. एमडी कॉलेजमध्ये कोणी एकांकिका स्पर्धा करत नव्हतं. मग मी आणि अंकुशने एमडी कॉलेजला अॅडमिशन घेतलं. तिथे पहिली एकांकिका केली आम्ही तोंडावर पडलो, बक्षीसे मिळाली नाहीत. दुसरी एकांकिका केली ती नंबरात आली.”
“पुढे ऑल द बेस्ट या नाटकातून व्यावसायिक नाटकात आलो. मग मैत्रीचा भाग असा आहे की आम्ही ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक करत होतो. केदार दुसऱ्या एका कॉलेजमधून स्पर्धेत होता. तो आमचा प्रतिस्पर्धी होता.पण, आमच्या एकांकिकेचं म्युझिक केदार करीत होता. त्या स्पर्धेत त्याच्या एकांकिकेचा पहिला नंबर आला होता आणि आमचा दुसरा आला होता. असे आम्ही एकमेकांना मदत करत-करत पुढे गेलो.”
“मैत्री कशी जपली जाते? तर तिथे कुठे स्वार्थ यायला नको. मैत्री निस्वार्थी असायला हवी. मैत्रीत व्यवहार येता कामा नये. मैत्रीत व्यवहार आला की मग अडचण येऊ शकते. तर आमच्यात तसं कधी तेव्हाही नव्हतं, आजही नाहीये. पाठीवर कौतुकाची थाप देणारी मैत्री असावी. काही चुकलं तर कान धरणारी असावी”, असे म्हणत केदार शिंदे व अंकुश चौधरी यांच्या मैत्रीबाबत वक्तव्य केले आहे.