अभिनेते किरण माने यांना ‘बिग बॉस मराठी ४’ने वेगळी ओळख दिली. किरण मानेंनी तल्लख बुद्धीच्या जोरावर ‘बिग बॉस’च्या खेळात डावपेच आखत टॉप ५ मध्ये त्यांचं स्थान निश्चित केलं होतं. पण ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. या शो नंतर किरण माने सातत्याने चर्चेत आहेत. या कार्यक्रमामुळे त्यांचा चाहता वर्ग खूप वाढला. तर आता ते एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

आतापर्यंत अनेक मालिका, नाटकं, चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेले किरण माने आता लवकरच ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहेत. ‘रावरंभा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. गेली अनेक दिवस या चित्रपटाची चर्चा होती. तर आता या चित्रपटातील व्यक्तिरेखांचे लूक समोर येत आहेत. नुकताच किरण मानेंनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं पोस्टर शेअर केलं.

आणखी वाचा : कुशल बद्रिके पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत, ‘या’ आगामी ऐतिहासिक चित्रपटातील लूक प्रदर्शित, म्हणाला…

‘रावरंभा’ या चित्रपटात किरण माने स्वराज्याचे हेर ‘हकीम चाचा’ ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं, “मालिका, चित्रपट, नाटकांमधून प्रेक्षकांची मन जिंकणारे बिग बॉस फेम मराठीतील प्रतिभावंत आणि हरहुन्नरी अभिनेते किरण माने ‘हकीम चाचा’च्या अनोख्या भूमिकेत… ‘रावरंभा’ १२ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात!” आता त्यांची ही पोस्ट खूप व्हायरल होत असून यावर कमेंट करत त्यांचे चाहते त्यांचा हा लूक आवडल्याचा सांगत आहेत. त्याचबरोबर या चित्रपटासाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा : नागराज मंजुळेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा, ‘या’ महान खेळाडूचे जीवन मोठ्या पडद्यावर उलगडणार

‘रावरंभा’ या बहुप्रतीक्षित चित्रपटामध्ये मराठीतील अनेक आघाडीचे कलाकार झळकणार आहेत. ओम भूतकर, अपूर्वा नेमळेकर, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. तर अभिनेता शंतनू मोघे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. १२ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.