कोल्हापूर येथे पन्हाळगडावर शूटिंगच्या दरम्यान कड्यावरून पडून अपघातात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. १९ मार्च रोजी ही घटना घडली होती. त्या तरुणाला तातडीने उपचारासाठी कोल्हापुरात दाखल करण्यात आले होतं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.पन्हाळा येथील मुख्य सज्या कोटी ते वारे बुरुज दरम्यान १९ मार्च रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास शूटिंग प्रसंगी ही घटना घडली होती. नागेश खोबरे (वय १९, सोलापूर) असे जखमीचे नाव होते.

पन्हाळगडावर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या दिग्दर्शक महेश मांजरेकर निर्मित चित्रपटाचे शूटिंग चालू होते. तट बंदीवर शुटींग सुरू असताना हा अपघात झाला होता. शूटिंगच्या वेळी नागेश प्रशांत खोबरे मोबाईल फोनवर बोलत असताना किल्ल्यापासून १०० फूट खाली खड्ड्यात पडला होता. अंधारात तटबंदीचा अंदाज येणं कठीण होतं. एवढ्या उंचीवरून खाली पडल्याने नागेश गंभीर जखमी झाला होता. त्यांच्या डोक्याला व छातीवर गंभीर जखमा झाल्या होत्या. लोकांनी दोरीच्या साहाय्याने खाली पडलेल्या नागेशला बाहेर काढले आणि तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र जखमी नागेश खोबरेचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टीव्ही ९ हिंदी’ने दिलेल्या वृत्तानुसार, नागेश चित्रपटाच्या सेटवर घोड्यांची काळजी घेत होता, त्याच दरम्यान त्याचा अपघात झाला. जखमी नागेशला उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याला चित्रपटाच्या शूटिंगसाठी बोलावलेल्या व्यवस्थापकांनी नागेशच्या उपचाराचा खर्च त्याच्या नातेवाईकांना देण्याचे मान्य केले होते. मात्र, गेल्या दहा दिवसांत खर्च केलेली रक्कम मिळाली नसल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळेच त्यांनी या संदर्भात इशारा देत जोपर्यंत उपचारासाठी पैसे मिळत नाहीत तोपर्यंत नागेशचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले.