Dashavatar Marathi Movie Collection Day 9 : मनोरंजनसृष्टीत सध्या सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने गेल्या आठवड्याभरात रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. विशेषत: वयाच्या ८१ व्या वर्षी दिलीप प्रभावळकरांनी साकारलेल्या बाबुली मेस्त्रीच्या भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे.

‘दशावतार’ सिनेमात प्रेक्षकांना कोकणातील संस्कृती, परंपरा, या देवभूमीला लाभलेला सुंदर निसर्ग, त्याच्या रक्षणाची जबाबदारी, राखणदार आणि बाबुली मेस्त्रीच्या आयुष्यातील शेवटचा ‘दशावतार’ या गोष्टी अनुभवायला मिळतात. याशिवाय बाबुली मेस्त्री आणि त्याचा मुलगा माधव यांच्यातील बाप-लेकाचं सुंदर नातं सर्वांचं लक्ष वेधून घेतं. यामुळे सिनेमा पाहताना अनेक प्रेक्षक भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं.

‘दशावतार’ने प्रदर्शित झाल्यावर नवव्या दिवशी आतापर्यंतची सर्वाधिक कमाई केली आहे. चित्रपटाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता हा सिनेमा दुसऱ्या शनिवारी चांगली कमाई करेल असा अंदाज आधीच चित्रपट समीक्षकांनी वर्तवला होता. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार या सिनेमाने प्रदर्शित झाल्यावर दुसऱ्या शनिवारी म्हणजेच ९ व्या दिवशी तब्बल २.६५ कोटींची कमाई केली असल्याचा प्रारंभिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या आकडेवारीत बदल होऊ शकतो.

नवव्या दिवशी २.६५ कोटींचा गल्ला…ही गेल्या नऊ दिवसातील ‘दशावतार’ सिनेमाची सर्वाधिक कमाई आहे. पहिल्या आठवड्याभरात ( ७ दिवसांत ) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०.८० कोटींचा गल्ला जमवला होता. यानंतर आठव्या दिवशी १ कोटी तर, नवव्या दिवशी २.६५ कोटींची कमाई करत आता या सिनेमाचं एकूण जागतिक कलेक्शन १४ कोटींपर्यंत पोहोचलं आहे.

याच पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय हे पाहून आणि अनेक भागात ‘दशावतार’चे शोज उपलब्ध नसल्याने निर्मात्यांनी या सिनेमाचे शो वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. “प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे अनेक चित्रपटगृहांमध्ये खेळ वाढवण्यात आले आहेत” अशी पोस्ट निर्मात्यांकडून शेअर करण्यात आली आहे.

२०२५ मध्ये अशी कामगिरी करणारा ‘दशावतार’ हा पहिलाच सिनेमा आहे. यावर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात यश कोणत्याच सिनेमाला मिळालं नव्हतं.

Dashavatar Marathi Movie Collection Day 9
Dashavatar Marathi Movie Collection Day 9

दरम्यान, ‘दशावतार’बद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे.