Dashavatar Marathi Movie Box Office Collection Day 10 : ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘दशावतार’ सिनेमाने दुसऱ्या रविवारी म्हणजे प्रदर्शित झाल्यावर दहाव्या दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. यामुळेच सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झालेली आहे. इतकंच नव्हे तर ‘दशावतार’ने गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या हिंदी सिनेमांना सुद्धा धोबीपछाड केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत ‘दशावतार’ सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. या सिनेमाला रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. अनेक ठिकाणी ‘दशावतार’चे शोज देखील वाढवण्यात आले आहेत. या सिनेमाने १० दिवसांत किती कलेक्शन केलंय जाणून घेऊयात..
‘दशावतार’ सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. दिलीप प्रभावळकरांनी वयाच्या ८१ व्या वर्षी साकारलेल्या बाबुली मेस्त्रीच्या भूमिकेचं सर्वत्र विशेष कौतुक करण्यात येत आहे. या सिनेमाने पहिल्या सात दिवसांत १०.८० कोटींची कमाई केली होती. यानंतर आठव्या व नवव्या दिवशी ‘दशावतार’ने अनुक्रमे १ कोटी व २.६५ कोटी कमावल्याचं वृत्त ‘सॅकनिल्क’ने दिलं आहे.
‘दशावतार’च्या कमाईत दहाव्या दिवशी मोठी वाढ झालेली आहे. या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या रविवारी म्हणजेच दहाव्या दिवशी ३ कोटी कमावले आहेत. यामुळे सिनेमाचं एकूण कलेक्शन १७.४५ कोटी झालं आहे. ( ही आकडेवारी प्रारंभिक आहे यात बदल होऊ शकतो ) २०२५ मध्ये आतापर्यंत अशी कामगिरी एकाही मराठी सिनेमाला करता आलेली नाही.
याशिवाय ‘दशावतार’ने टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ ला देखील मागे टाकलं आहे. देशभरात स्क्रिनिंग असून टायगरच्या ‘बागी ४’ सिनेमाने दहाव्या दिवशी फक्त २.१५ कोटी कमावले होते. त्यामुळे ‘दशावतार’सारख्या रिजनल चित्रपटाने दहाव्या दिवशी सर्वाधिक कमाई करून हिंदी सिनेमाला चांगली टक्कर दिल्याचं पाहायला मिळत आहे.
‘दशावतार’बद्दल सांगायचं झालं, तर हा सिनेमा १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, रवी काळे, अभिनय बेर्डे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.