Dashavatar Movie Collection : दिलीप प्रभावळकरांची प्रमुख भूमिका असलेला ‘दशावतार’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात १२ सप्टेंबरला हा सिनेमा संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला होता. आज हा सिनेमा प्रदर्शित होऊन ७ दिवस पूर्ण झाले आहेत. या सिनेमाच्या सात दिवसांच्या कलेक्शनची आकडेवारी निर्मात्यांनी नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे.
“मायबाप प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाची ताकद दाखवून दिली. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे ‘दशावतार’ने पहिल्या आठवड्यात जगभरात १०.८० कोटींची कमाई केली आहे. हीच खरी मराठी चित्रपटसृष्टीची आणि मराठी रसिक प्रेक्षकांची ताकद आहे” अशी पोस्ट शेअर करत झी स्टुडिओजने ‘दशावतार’च्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.
‘दशावतार’ हा यंदाच्या वर्षात आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. याशिवाय पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर १० कोटींहून अधिक कमाई करणारा २०२५ मधील पहिला सिनेमा म्हणून ‘दशावतार’ची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी यंदाच्या वर्षी असंच यश अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या ‘जारण’ या भयपटाला मिळालं होतं. मात्र, जारणने बॉक्स ऑफिसवर १० कोटींचा टप्पा ओलांडला नव्हता. ‘दशावतार’ने पहिल्याच आठवड्यात भरभरून यश मिळवत तब्बल १०.८० कोटींचा गल्ला जमावला आहे.
‘दशावतार’ला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत असून बॉलीवूडच्या बड्या सिनेमांना टक्कर देत ‘दशावतार’ने अवघ्या सात दिवसांत दमदार कमाई केली आहे. या सिनेमाचं कथानक कोकणी संस्कृती, परंपरा, याठिकाणी असलेला निसर्गरम्य परिसर आणि आपल्या जमिनीचं-निसर्गाचं संरक्षण करणारा कोकणी माणूस यावर आधारित आहे.
दरम्यान, ‘दशावतार’बद्दल सांगायचं झालं तर, या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी केलं आहे. यामध्ये दिलीप प्रभावळकर यांच्यासह सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, भरत जाधव, महेश मांजरेकर, सुनील तावडे, आरती वडगबाळकर, रवी काळे आणि विजय केंकरे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.