Gashmeer Mahajani on How to Handle Depression: अभिनेता गश्मीर महाजनी हा लोकप्रिय अभिनेता आहे. मराठी चित्रपट, हिंदी मालिका, तसेच ओटीटी वेब सीरिज अशा माध्यमांतून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्याबरोबरच तो खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्येदेखील स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.
आता गश्मीर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिनयाबरोबरच गश्मीर महाजनी सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतो. आता नुकतेच त्याने चाहत्यांबरोबर आस्क मी हे सेशन घेतले. त्यामध्ये चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले आणि गश्मीरने त्याला उत्तरेदेखील दिली आहेत.
गश्मीर महाजनी काय म्हणाला?
एका चाहत्याने विचारले की, नैराश्याला कसे सामोरे जावे? त्यावर गश्मीरने उत्तर दिले, “स्वत:वर दया करणं टाळा. नैराश्याची सुरुवात व शेवट तिथून होतो”, असे म्हणत नैराश्याचा सामना कसा करावा, यावर गश्मीरने वक्तव्य केले आहे. आणखी एका चाहत्याने विचारले की, जर तुम्हाला तुमची कामाची जागा आवडत नसेल, मात्र तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी थांबावे लागणार असेल, तर तुम्ही काय कराल? त्यावर गश्मीर म्हणाला, “अशा वेळी मी माझं काम अपेक्षेपेक्षा चांगलं करेन.”

गश्मीरने एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याचा आवडता रंग कोणता हेदेखील सांगितले. राखाडी हा त्याचा आवडता रंग असल्याचे अभिनेता म्हणाला. तसेच तुझ्यासारखी चांगली शरीरयष्टी कशी करता येईल, असा एकाने प्रश्न विचारला. त्यावर गश्मीर म्हणाला की, सकाळी लवकर उठा आणि मेहनत करा.

अभिनेत्याने एका जुन्या मुलाखतीत त्याच्या आयुष्याचा एक काळ असा होता की, तो नैराश्याचा सामना करीत होता, असे वक्तव्य केले. “मी खूप दारू प्यायचो. दिवसभर दारू प्यायचो. मी स्वत:ला सहा महिने एका रूममध्ये कोंडून घेतलं होतं. मी बाहेर जायचो नाही. मी कोणाचे फोन उचलायचो नाही”, असे वक्तव्य अभिनेत्याने केले होते. तसेच या काळात त्याच्या कुटुंबाने त्याला साथ दिल्याचेदेखील गश्मीर म्हणाला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अभिनेता चिऊताई चिऊताई दार उघड या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याबरोबरच महेश मांजरेकर दिग्दर्शित एक मीरा एक राधा या चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, सुरभी भोसले या अभिनेत्रीदेखील प्रमुख भूमिकांत दिसल्या होत्या. गश्मीर महाजनीचे ‘फुलवंती’ चित्रपटातील भूमिकेसाठी कौतुक झाले. या चित्रपटात प्राजक्ता माळी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. आता आगामी काळात तो कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.