Hemant Dhome Marathi Movie : ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ आणि ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटांच्या यशानंतर निर्माती क्षिती जोग आणि लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे या लोकप्रिय जोडीचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच हेमंतने या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित केलं होतं. या चित्रपटाचं नाव आहे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’.
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटाची स्टारकास्ट आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची पोस्ट दिग्दर्शक हेमंत ढोमेने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘आता मराठी शाळा पुन्हा भरणार!’ असं म्हणत हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी शाळांची घटती संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी भाषेबद्दलचा गर्व या विषयांचा मनोरंजक तरीही हृदयस्पर्शी पद्धतीने घेतलेला वेध म्हणजे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’. या चित्रपटात मराठी कलाकारांची दमदार फळी झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.
या दमदार कलाकारांसह हिंदी कलाविश्व गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता कोळी या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. प्राजक्ता कोळीला सगळे ‘मोस्टली सेन’ म्हणून देखील ओळखतात. तिच्या इन्स्टाग्राम, युट्यूब चॅनेलचं नाव मोस्टली सेन असं आहे. ‘मिसमॅच्ड’ सीरिजमुळे तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. आता प्राजक्ता मराठी कलाविश्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतो, “या चित्रपटाचा विषय माझ्या अगदी मनाजवळचा आहे. आपल्या मराठी शाळा म्हणजे आपली ओळख. या शाळांमधूनच अनेक पिढ्या घडल्या, अनेक नामवंत मंडळी तयार झाली. पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत आणि त्यांचं महत्त्व घटत चाललं आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटातून आम्ही या विषयावर मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय याचा मला खूप आनंद आहे आणि माझ्या याआधीच्या चित्रपटांवर प्रेक्षकांनी जितकं प्रेम केलं तितकंच ते याही चित्रपटावर करतील याची खात्री आहे.”
दरम्यान, ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ येत्या १ जानेवारी २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.