मराठी कलाविश्वात गेले काही दिवस हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलीवूडमध्ये दोन तगडे चित्रपट प्रदर्शित होऊनही ‘झिम्मा २’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या चित्रपटाद्वारे सात बायकांची गोष्ट मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आली आहे. सासू-सुनेचं नातं, दुसरं लग्न, महिलेला मूल न होणं अशा गंभीर विषयांवर या चित्रपटाच्या माध्यमातून हलक्या फुलक्या पद्धतीने भाष्य करण्यात आलं आहे. ‘झिम्मा २’ मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर नुकतीच या कलाकारांनी टीव्ही ९ मराठीच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी या कलाकारांसह दिग्दर्शकाने अनेक सामाजिक विषयांवर आपलं मत मांडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काही दिवसांपूर्वी मासिक पाळीत महिलांना भरपगारी रजा देण्याबद्दल विधान केलं होतं. मासिक पाळी ही शारीरिक व्याधी नाही त्यामुळे भरपगारी रजा देण्याचा प्रश्नच येत नाही असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्याचं काहींनी समर्थन केलं, तर काहींनी विरोध केला. यावर आता ‘झिम्मा २’च्या कलाकारांनी आपलं मत मांडलं आहे.

हेही वाचा : “परंपरेत कुठे रोमान्स घुसवता?”, मुग्धा-प्रथमेशच्या व्याहीभोजनाच्या फोटोवर नेटकऱ्याची कमेंट, गायकाने दिलं स्पष्ट उत्तर

‘झिम्मा २’चा दिग्दर्शक हेमंत ढोमे याबद्दल म्हणाला, “आपले आजी-आजोबा पूर्वीपासून आपल्या घरातील महिलांना चार दिवस स्वयंपाकघरात किंवा देवघरात जाऊ नकोस असं सांगायचे. याचा अर्थ अस्पृश्यता वगैरे नव्हता. ते लोक मुलींकडे माणुसकीच्या दृष्टीकोनातून पाहात होते. मुलींना त्या दिवसात थकवा यायला नको हा त्यामागचा मूळ उद्देश होता. आपण सोयीस्कररित्या त्याचा वेगळा अर्थ काढला आहे. प्रत्येकीच्या शरीरावर या गोष्टी अवलंबून असतात. काही मुलींना त्रास होतो, काहींना होत नाही. पण, हे काही अपंगत्व नाहीये असं काही विधान करू नये असं मला वाटतं. ही एक शारीरिक गोष्ट असून याचा सगळ्यांनी आदर केला पाहिजे. माझ्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक महिला आज मला याविषयी हक्काने मेसेज करून सांगू शकतात. कधी-कधी त्यांनी न सांगताही मला सगळं कळतं. मासिक पाळीच्या काळात मुलींना शारीरिक विश्रांती देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी स्वत: माझ्या टीममधल्या मुलींना बरं तीन दिवस येऊ नका असं सांगतो. कारण, त्या दिवसांत विश्रांतीची गरज कोणालाही भासू शकते असं माझं मत आहे.”

हेही वाचा : “मी त्याला…”, विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या रायच्या अफेअरबद्दल कळाल्यावर ‘अशी’ होती वडील सुरेश ओबेरॉय यांची प्रतिक्रिया

अभिनेत्री व निर्माती क्षिती जोग याविषयी म्हणाली, “मासिक पाळी हे अपंगत्व नाही हे मी जरूर मान्य करेन. पण, मला स्वत:ला मासिक पाळीचा भयंकर त्रास होतो. मला उठता-बसता येत नाही, मला उलट्या होतात या सगळ्या गोष्टी आता सिद्धार्थने देखील शूटिंगच्या वेळी पाहिल्या असतील. मला पहिले दोन दिवस खूप जास्त त्रास होतो. अशावेळी मग मासिक पाळी संपल्यावर मी सेटवर अधिक काम करते. हिंदी मालिका आणि चित्रपटाच्या सेटवर सुद्धा मला याबाबतीत समजून घेतलं आहे. हा त्रास माणसागणिक बदलत असतो. त्यामुळे अशा विषयांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.”

“क्षिती आणि हेमंतने जे सांगितलं त्याच्याशी मी एकदम सहमत आहे. कारण, प्रत्येक व्यक्तीला वेगळा त्रास होऊ शकतो. पण, मासिक पाळीत ज्या महिलेला त्रास होतोय तिला कामावरून घरी जाण्याचा अधिकार नक्की असावा” असं मत सिद्धार्थ चांदेकरने मांडलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhimma 2 fame actors hemant dhome and others reacts on smriti irani mentruation paid leave policy statement sva 00
First published on: 19-12-2023 at 13:22 IST