Kamal Haasan Congratulates Treesha Thosar For Winning National Award : यंदा ७१ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडल्यावर सर्वत्र चिमुकली बालकलाकार त्रिशा ठोसरची चर्चा होऊ लागली आहे. अवघ्या ६ वर्षांची त्रिशा सुंदर अशी साडी नेसून या सोहळ्याला पोहोचली होती. इतक्या लहान वयात कमालीच्या आत्मविश्वासाने ती मंचावर पुरस्कार स्वीकारायला गेल्याचं पाहून उपस्थित प्रेक्षक सुद्धा भारावले होते.

याशिवाय त्रिशाने ‘नाळ २’ मध्ये साकारलेल्या चिमी या भूमिकेचं सुद्धा सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडल्यावर मोहनलाल, शाहरुख खान, राणी मुखर्जी, विक्रांत मॅसी अशा स्टार्सची तिने भेट घेतली. तसेच त्रिशाच्या आई-वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘नाळ २’ची संपूर्ण टीम, दिग्दर्शक, सहकलाकार आणि त्रिशाला भरभरून प्रेम देणाऱ्या रसिक प्रेक्षकांचे आभार मानल्याचं पाहायला मिळालं.

यानंतर त्रिशाला आणखी एका खास व्यक्तीचा व्हिडीओ कॉल आला. त्रिशाचं कौतुक करण्यासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते कमल हासन यांनी फोन केला होता. तसेच यावेळी अभिनेत्यांनी त्रिशाच्या आईला खास सल्ला दिला. या दोघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं पाहुयात…

कमल हासन यांचा त्रिशाला व्हिडीओ कॉल

त्रिशा – हाय
कमल हासन – माझं नाव कमल हासन आहे.
त्रिशा – हो सर… माहितीये.
कमल हासन – मी तुझा पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ पाहिला, अभिनंदन…तर, सध्या तू काय करतेस? कोणत्या सिनेमात काम करत आहेस?
त्रिशा महेश मांजरेकर सरांच्या सिनेमात काम करतेय…
कमल हासन – ओह, ते खूप चांगले दिग्दर्शक आहेत, माझे मित्रही आहेत. पुढचा सिनेमा करण्यापूर्वी मला मेसेज कर…आणि कायम माझ्या संपर्कात राहा.
त्रिशाची आई – हॅलो सर, धन्यवाद तुम्ही फोन करून त्रिशाचं कौतुक केलंत. तुमचे आशीर्वाद असेच तिच्या पाठिशी कायम ठेवा.
कमल हासन – तुमच्या मुलीमध्ये खूप टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट सगळ्यांमध्ये नसतं. तिला आता सर्वांच्या आशीर्वादासह ट्रेनिंगची सुद्धा गरज आहे. ती स्पेशल आहे…आतापासून तिला शिकवलं तर ती खूप पुढे जाईल. आतापासून तिला ट्रेन करा कारण, तिच्यात तो आत्मविश्वास आता निर्माण झाला आहे. काहीही मदत लागली तर मला नक्की सांगा. तिला डान्स, गाणी कशात आवड आहे ते सुद्धा बघा. तुला खूप खूप शुभेच्छा!

दरम्यान, आता ही चिमुकली त्रिशा ठोसर लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या बहुचर्चित सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये त्रिशाचा अभिनय प्रेक्षकांना खूप जास्त आवडला आहे.