Swapnil Rajshekhar Reaction On KBC Viral Video Of Ishit Bhatt : ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सहभागी झालेला १० वर्षीय स्पर्धक इशित भट्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हॉटसीटवर बसलेल्या इशितने अमिताभ बच्चन यांना उलट उत्तरं दिल्याचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

KBC च्या नियमानुसार अमिताभ बच्चन सर्वात आधी प्रत्येक स्पर्धकाला खेळाचे नियम समजावून सांगतात. मात्र, इशितने ‘मला कोणतेही नियम वगैरे समजावून सांगू नका…मला सगळं माहीत आहे’ असं बिग बींना उद्धटपणे सांगितलं. यानंतर सुरू झाला प्रश्न-उत्तरांचा खेळ…स्क्रीनवर ऑप्शन येण्याआधीच तो अमिताभ बच्चन यांना उत्तरं सांगून मोकळा व्हायचा. पण, त्याची खरी कोंडी झाली पाचव्या प्रश्नाला…यावेळी इशितला ऑप्शन काय आहेत? हे जाणून घ्यायची आवश्यकता भासली पण, इथेही त्याचा अतिआत्मविश्वास नडला आणि त्याचं उत्तर चुकलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सर्वत्र या लहान मुलाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. यावर आता मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

KBC प्रकरणावर स्वप्नील राजशेखर यांची पोस्ट

अजून विषय ताजा आहे….
तर मी ही बोलून घेतो..

एकतर KBC team या सगळ्या मुलांना रीतसर brief करते..
मुलांना माफक आगाऊपणे बच्चनसाहेबांना काहीतरी उत्तरं द्यायला सांगितलं जातं…
त्यांचा आगाऊपणा आणि त्यावरची बच्चनसाहेबांची प्रतिक्रिया हे कार्यक्रमात humour आणतात..

यापूर्वी आणि आता सुध्दा लहान मुलांचे सगळे एपिसोड्स TRP च्या दृष्टीने यशस्वी झाले आहेत. अनेक मुलांनी यापूर्वीही थोडाफार आगाऊपणा तिथे केलाय.. पण तो Smartness, Cuteness च्या सीमारेषेवर राहिला.

हा जो इशित भट्ट मुलगा आहे त्यालाही त्याचा ओव्हर स्मार्टनेस पाहून आधी प्रोत्साहन दिलं गेलंय हे नक्की.
पण हा मुलगा वहावत गेला…
एकतर हॉटसीटवर येणं आणि पहिले काही प्रश्न सोपे येणं यातून त्याचा आगाऊपणा उर्मटपणात बदलला… शिवाय Creative Team कडून मिळालेलं प्रोत्साहन या सगळ्याचा परिणाम दिसला…

या मुलाला असलेल्या ADHD Syndrome बाबत बालमानसशास्त्रज्ञांनी केलेलं निदान योग्य आहेच.
शिवाय माझ्या अंदाजाने त्याला अजून एक Syndrome आहे ‘शिनचॅन सिंड्रोम’.

“सवाल तो पुछो”, “ऑप्शन तो बताओ” हा जो त्याचा सूर आहे तो त्या शिनचॅन नामक महाआगाऊ, उर्मट आणि लहान मुलात लोकप्रिय अशा कार्टून मुलाचा सूर आहे…शिनचॅन पाहत मोठी झालेली मुलं साधारणपणे याच छापाचं बोलतात.. याची जबाबदारी अर्थात पालकांची असते..

थोडक्यात, मुलगा मूळचा आगाऊ असेल, Single Child असल्यामुळे Over Pampered असेल. सिंड्रोमग्रस्त असेल पण त्याच्या वर्तणुकीला उल्लेखीत इतरही घटक कारणीभूत आहेत… आधीच मर्कट तशात मद्य प्याला, तशात वृश्चिक दंश झाला… असं झालंय त्याचं..

तस्मात देशाने त्याला सोडावं आता… झालं तेवढं पुरे झालं.. अतीच द्वेष हेटाळणी झाली त्याची…

अनेक राजकारणी याहून जास्त उर्मटपणा करतात, आपलाच पैसा लाटून आपल्यालाच माज दाखवत फिरतात.. त्यांचं काय करतो आपण? हा तर लहान मुलगा आहे…

दरम्यान, या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत स्वप्नील राजशेखर यांनी अतिशय मार्मिकपणे या प्रकरणाबाबत बाजू मांडलीये असं म्हटलं आहे. “सर अगदी बरोबर आहे”, “परफेक्ट आहे सर…मुलं लहानपणी काय पाहतात यावर पालकांचं लक्ष असायला पाहिजे”, “हल्ली टीआरपीसाठी स्क्रीप्टेड शो बनवले जातात” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.