“आजवर १६ सिनेमे करून मला तरी कुठे पारितोषिक मिळालंय? आपण प्रेक्षकांसाठी अव्याहत काम करायचं!”

पडद्यावर काम करणारे कलाकार प्रत्येकाला भावतात परंतु, पडद्यामागचे किमयागार फारसे नावाजले जात नाहीत. या सगळ्यात अपवाद ठरतात ते प्रेक्षकांचं मन ओळखणारे दिग्दर्शक केदार शिंदे. ‘अगं बाई अरेच्चा!’ पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता ‘बाईपण भारी देवा’पर्यंत येऊन पोहोचला आहे. दे दोन्ही चित्रपट पाहिल्यावर एक गोष्ट आवर्जून जाणवते ती म्हणजे, चित्रपटात बायकांचे आवाज ऐकू येणाऱ्या संजय नार्वेकरांपेक्षा केदार शिंदेंना बायकांच्या मनातलं जास्त ऐकू येतं. यामुळेच २०२३ मध्ये ‘बाईपण’सारखी सुंदर कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ज्यांचे चित्रपट फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात गाजतात अशा या विचारशील दिग्दर्शकाचा आज ५१ वा वाढदिवस आहे.

वाढदिवसाआधीच केदार शिंदेंना एक मोठं गिफ्ट मिळालं आहे. दिग्दर्शकाचं नाव यंदाच्या ‘फोर्ब्स इंडिया मॅगझिन’मध्ये झळकल्याने सध्या सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. २०२३ हे संपूर्ण वर्ष, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला मिळालेलं यश आणि नुकतीच फोर्ब्सने त्यांच्या कामाची घेतलेली दखल याविषयी केदार शिंदेंनी लोकसत्ता डिजिटलशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : सयाजी शिंदे : साताऱ्यात वॉचमनची नोकरी, टॉलीवूडचा ‘डॅशिंग व्हिलन’ ते सह्याद्रीला आपलंस करणारा वृक्षप्रेमी अभिनेता

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या यशानंतर केदार शिंदेंना थेट ‘फोर्ब्स इंडिया मॅगझिन’मध्ये झळकण्याची संधी मिळाली. या ऐतिहासिक कामगिरीचं श्रेय कोणाला देणार? याबाबत दिग्दर्शक म्हणाले, “‘फोर्ब्स इंडिया मॅगझिन’मध्ये माझी निवड होणं ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. परंतु, खरं सांगायचं झालं, तर याचं संपूर्ण श्रेय माझ्या संपूर्ण टीमचं आहे. मला आतापर्यंत एकही पुरस्कार मिळाला नाही पण, प्रेक्षकांनी माझ्या कामाचं मला कायम रिवॉर्ड दिलं. कोणत्याही पुरस्कारापेक्षा प्रेक्षकांकडून मिळणारी कौतुकाची थाप ही बहुमोलाची असते.” यंदा फोर्ब्समध्ये केदार शिंदेंसह अ‍ॅटली, करण जोहर, सिद्धार्थ आनंद, विधू विनोद चोप्रा असे दिग्गज दिग्दर्शक झळकले आहेत.

हेही वाचा : Irrfan Khan : त्याचं जाणं चटका लावून गेलं, ‘या’ मराठी अभिनेत्याने इरफान खानवरून ठेवलंय लाडक्या लेकीचं नाव

‘बाईपण भारी देवा’ला मिळालेलं यश

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा परब-चौधरी या सहा अभिनेत्रींनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटातील या सहा बहिणींची कथा प्रत्येकाला आपलीशी वाटली. याविषयी केदार शिंदे म्हणाले, “‘बाईपण भारी देवा’मुळे आता जबाबदारी आणखी वाढली आहे. हा चित्रपट मंगळागौरीवर आधारित असल्याने मी आणि निखिल साने आम्ही दोघांनी मिळून हा चित्रपट श्रावण महिना सुरू होण्याआधी प्रदर्शित करायचा हे ठरवलं होतं. आमच्या संपूर्ण टीमने यासाठी खूप मेहनत घेतली होती. प्रेक्षकांना या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट कनेक्ट झाली आणि आमचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या इंडस्ट्रीत मी गेली ३० वर्षे काम करतोय त्यामुळे प्रत्येक चित्रपट चालेलच असं नाही. याची मला चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे भविष्यात नवीन काम करताना जुन्या जबाबदारीची जाणीव होत राहणार. प्रेक्षकांना चांगलंच देण्याचा प्रयत्न असेल.”

केदार शिंदेंच्या २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अगं बाई अरेच्चा २’ चित्रपटाला अपेक्षित व्यावसायिक यश मिळालं नव्हतं. परंतु, त्यांनी कायम इतर दिग्दर्शकांचं कौतुक केलं. ‘बाईपण भारी देवा’च्या रुपाने ते पुन्हा एकदा नव्या दमाने प्रेक्षकांसमोर आले. यश असो किंवा अपयश केदार शिंदे नेहमीच ‘हेही दिवस जातील’ असं म्हणत असतात. “बाईपण भारी देवा चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून फार आनंद झाला. मात्र, यापुढे अजून चांगलं काम केलं पाहिजे याचं दडपण आहे आणि भविष्यात असंच चांगलं काम करण्याचं नवीन आव्हान मी स्वीकारलंय” असं दिग्दर्शकाने सांगितलं.

हेही वाचा : शाहरुख खान : ४ वर्षांच्या ब्रेकनंतर ‘पठाण’ने बाजी पालटली अन् सांगितलं मीच खरा ‘बादशहा’!

केदार शिंदे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर फक्त महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण जगाने प्रेम केलं. आता त्यांच्या पश्चात हा वारसा त्यांचे नातू दिग्दर्शक केदार शिंदे पुढे नेत आहेत. पद्मश्री शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केदार शिंदेंनी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी दिग्दर्शक त्यांच्या जुन्या पोस्टमध्ये म्हणतात, “मी पुढे दिग्दर्शक म्हणून कसा आहे? हे सांगणं मला अवघड असलं तरी, मी शाहिरांचा नातू म्हणून कसा आहे? याविषयी लोकं भरभरून बोलतील याची खात्री आहे. माझ्या आजोबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? यासाठी एक सिनेमा पाहिला तरी समजून येईल. माझी नातवंड जेव्हा विचार करतील की, आपल्या आजोबांनी काय केलं? त्यांच्यासाठी हा एक तुमचा सिनेमा पाहिला तरी खूप झालं!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, केदार शिंदेंच्या आजवरच्या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं, तर ‘बॉम्ब-ए-मेरी-जान’ या व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून केदार शिंदे यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांच्या या नाटकाला फारसं यश मिळालं नाही. परंतु, तरी देखील त्यांनी काम सुरू ठेवलं. यापुढची त्यांची ‘आमच्या सारखे आम्हीच’, ‘मनोमनी’, ‘श्रीमंत दामोदरपंत’,’तू तू मी मी’, विजय दिनानाथ चव्हाण’, ‘आता होऊनच जाऊ दे’, ‘सही रे सही’, ‘लोचा झाला रे’, ‘गोपाला रे गोपाला’ ही सगळी नाटकं यशस्वी ठरली. याशिवाय ‘अगं बाई… अरेच्चा!’, ‘जत्रा’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’, ‘ह्यांचा काही नेम नाही’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘गलगले निघाले’ अशा केदार शिंदेंच्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अशा या मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवणाऱ्या प्रयोगशील दिग्दर्शकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!