‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होत आहेत. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. आता या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शक जोडीसाठी केदार शिंदे यांनी खास पोस्ट लिहिली आहे.
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा लोकप्रिय संगीत दिग्दर्शक साई-पियुष यांनी सांभाळली आहे. या चित्रपटातील सगळी गाणी प्रेक्षकांना आवडत आहेत. या चित्रपटातील साई-पियुष यांच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. आता दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील एक खास पोस्ट लिहित त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
केदार शिंदे यांनी साई-पियुष यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “साई-पियुष…१० वर्षांपुर्वी संगीतकार जोडी मला भेटली. या वर्षात बरीच कामं आम्ही एकत्र केली. नाटक सिरीयल सिनेमा… पण काही केल्या जे सिनेमे एकत्र केले त्यातला एकही प्रदर्शित होत नव्हता. काय भानगड आहे? त्यांनाही आणि मलाही कळत नव्हतं. त्यांना धीर देणे यापलिकडे मला काही जमत नव्हतं. आपल्यावर कुणी विश्वास टाकला की, एक प्रकारची जबाबदारी येते. ‘बाईपण भारी देवा’ गेली तीन वर्षं रखडला. त्यांचं उत्तम काम आज लोकांसमोर आलय. भविष्यात आता सगळं मंगल होणार. त्यांनी फक्त मन लावून काम करण्याची गरज आहे आणि ते निश्चितच त्यांच्या कडून होईल. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.”
हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ सुपरहिट, पण केदार शिंदे यांची लेक सना कुठे आहे? घ्या जाणून
आता केदार शिंदे यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर कमेंट करत नेटकरी साई-पियुष यांच्या कामाचं कौतुक करत आहेत. तर याचबरोबर हा चित्रपट खूप आवडल्याचं प्रेक्षक कमेंट करून सांगत आहेत.