मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. गेल्या सहा वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा जितका मोठा चाहता वर्ग आहे, तितकाच मोठा चाहता वर्ग या कार्यक्रमातील कलाकारांचा आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. तसंच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार नवनवीन चित्रपट, नाटकातून विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे. त्यापैकी एक म्हणजे पृथ्वीक प्रताप.

अभिनेता पृथ्वीक प्रतापने आपल्या अतरंगी अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पृथ्वीक मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही सक्रिय झाला आहे. हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये तो वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. लवकरच पृथ्वीक नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पृथ्वीकच्या लग्नानंतरचा हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे.

गेल्या वर्षी २५ ऑक्टोबरला पृथ्वीक प्रतापचा अत्यंत साध्या पद्धतीने लग्नसोहळा पार पडला होता. प्राजक्ता वायकूळ हिच्याशी लग्नागाठ बांधून पृथ्वीकने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. पृथ्वीक आणि प्राजक्ताचं नोंदणी पद्धतीने लग्न झालं होतं. पृथ्वीकच्या लग्नाला २५ फेब्रुवारीला चार महिने पूर्ण होतील. अशातच लग्नानंतरचा पृथ्वीकचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील लूकचा पोस्टर नुकताच पृथ्वीकने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

“एकतर प्रचंड प्रेम नाहीतर डारेक्ट गेम…अशा स्वभावाचा आपला जिगरी यार रवी,” असं कॅप्शन लिहित पृथ्वीकने नव्या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. पुष्कर जोग लिखित, दिग्दर्शित ‘हार्दिक शुभेच्छा…पण त्याचं काय?’ चित्रपटात पृथ्वीक झळकणार आहे. त्यामुळे पृथ्वीकवर सध्या शुभेच्छांचा वर्षावर होतं आहे.

पृथ्वीक प्रतापच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ता माळी म्हणाली, “अभिनंदन भावा.” तर पुष्कर जोग म्हणाला, “ग्रेट अभिनेता, ग्रेट माणूस.” पृथ्वीकला ‘हार्दिक शुभेच्छा…पण त्याचं काय?’ या नव्या चित्रपटात पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘हार्दिक शुभेच्छा…पण त्याचं काय?’ चित्रपटात पृथ्वीकसह पुष्कर जोग, हेमल इंगळे, विजय पाटकर, विशाखा सुभेदार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. २१ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रटातील गाणी सध्या चर्चेत आहेत.