Mana Che Shlok Movie Controversy : मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक हा सिनेमा १० ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. सेन्सॉर बोर्डासह उच्च न्यायालयाने या सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, तरीही पुण्यात या सिनेमाचे दोन शो काही हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद पाडण्यात आले होते. यानंतर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीने एकत्र येत या चित्रपटाच्या टीमला पाठिंबा दिला.
सिनेमाच्या नावावरून झालेल्या वादामुळे ‘मना’चे श्लोक चित्रपटाचं नाव बदलून आता ‘तू बोल ना’ असं करण्यात आलं आहे. १६ ऑक्टोबरला हा सिनेमा पुन्हा एकदा नव्या नावासह प्रदर्शित झाला आहे.
याबाबत आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डा’ला उपस्थिती लावली होती. यावेळी महेश मांजरेकर नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात…
“मना’चे श्लोक सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी बरेच नट पुढे आले. पण, त्यांनी एक तासात नाव बदलण्याचा निर्णय घेतला…ते का नाही थांबले? थांबूदेत की…मी ‘शिक्षणाच्या आयचा घो’ सिनेमाच्या वेळी शेवटपर्यंत थांबलो. मी नाही म्हणजे नाही सांगितलं…अजिबात नाव बदलणार नाही! यामुळे समोरच्या लोकांना प्रोत्साहन मिळतं की, आपण परत यांच्यावर हल्ला केला की, परत हे नाव बदलतील. ‘शिक्षणाच्या आयचा घो’ याबाबतीत सांगायचं झालं तर, ही शिवी वगैरे नव्हती…आयचा घो म्हणजेच कोकणात ‘आईचा नवरा’. कोणाला तरी वाटलं ती शिवी आहे. पण, यामुळे कुणाच्या भावना वगैरे दुखावल्या नव्हत्या आणि असं नाव मी ठेवतच नाही. तसंच ‘मनाचे श्लोक’ ही एक मनवा आणि श्लोक यांची गोष्ट होती. त्यामुळे त्यांनी त्यावर ठाम राहायला पाहिजे होतं.” असं मत महेश मांजरेकरांनी व्यक्त केलं आहे.
ते पुढे म्हणाले, “जर सेन्सॉरने पास केलंय तर कोणीही त्यावर आक्षेप घेऊ नये या ठाम मताचा मी आहे. पण, तुम्ही सुद्धा ठाम राहा! हिंदीत सुद्धा असंच होतं. अलीकडे बरेच सिनेमे निघतात, त्यात प्रोपगंडा चित्रपटांचाही समावेश असतो. पण, हे प्रेक्षकांच्या हातात आहे की, अशा सिनेमांना जायचं की नाही.”
दरम्यान, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा ३१ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
