‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवविरोधात एका रेव्ह पार्टीत सापाचे विष आणि परदेशी तरुणींचा पुरवठा केल्याप्रकरणी दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात आता मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिचा पूर्वाश्रमीचा पती प्रदीप खरेरा याचाही संबंध असल्याचं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. एल्विशच्या सगळ्या व्हायरल व्हिडीओमध्ये प्रदीप स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे “तू सुद्धा या प्रकरणात सामील आहेस का?” अशाप्रकारचे अनेक प्रश्न त्याला नेटकऱ्यांकडून सातत्याने विचारले जात होते. यावर आता प्रदीपने व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलेलं आहे.

हेही वाचा : “मला तुमच्यासारख्या लोकांमुळे…”, डीपफेक व्हिडीओ प्रकरणी पाठिंबा देणाऱ्या अमिताभ बच्चन यांचे रश्मिकाने मानले आभार

प्रदीप या व्हिडीओमध्ये म्हणतो, नमस्कार मित्रांनो! एल्विशबद्दल अलीकडे ज्या बातम्या व्हायरल होत आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, कृपया या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. खोट्या प्रकरणात एल्विशचं नाव पुढे करण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. आमच्या दोघांचे एकत्र व्हिडीओ पाहून अनेकांनी मला व माझ्या कुटुंबीयांना फोन करून याबद्दल चौकशी केली. पण, मी हेच सांगेन की, आम्हाला चुकीच्या पद्धतीने यात अडकवण्यात येत आहे.

“माझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. काही गोष्टी नकारात्मकतेने पसरवल्या जात आहेत. आम्ही सगळी मुलं एका गाण्याच्या शूटिंगसाठी जमलो असतानाचे हे सगळे व्हिडीओ आहेत. हा व्हायरल व्हिडीओ गाण्याचा एक भाग होता. पण, हे गाणं आम्ही सहा महिन्यांपूर्वी शूट केलं होतं. आम्ही सापांची तस्करी वगैरे केलेली नाही.” असं स्पष्टीकरण देत प्रदीप खरेराने काही व्हायरल व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी त्याच्या स्पष्टीकरणाचं समर्थन केलं असून, अनेकांनी प्रदीपचं स्पष्टीकरण खोटं असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा : अक्षरा-अधिपतीची ऑनस्क्रीन जोडी पाहून काय वाटतं?”, बायकोबद्दल सांगताना विराजस कुलकर्णी म्हणाला, “ते दोघं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा दोघेही घटस्फोट घेण्याच्या प्रक्रियेत आहेत. काही काळ एकमेकांना डेट केल्यावर दोघांनीही १९ जानेवारी २०२१ ला लग्न केलं होतं. परंतु, वर्षभरातच मानसीने पतीपासून विभक्त होणार असल्याची माहिती दिली. यानंतरच्या अनेक मुलाखतींमध्ये तिने प्रदीप खरेरावर फसवणुकीचे आरोप केले होते.