Manasi Naik on Not worked films for so many years: अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या अभिनय, तसेच नृत्यासाठी ओळखली जाते. मात्र, अनेक वर्षे ती चित्रपटांत काम करताना दिसली नव्हती. आता लवकरच ती ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटात मानसीबरोबर अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील गाणी प्रदर्शित झाली. ही गाणी प्रेक्षकांना खूपच आवडली असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मानसीने एका मुलाखतीत ती इतकी वर्षे चित्रपटांत का दिसली नाही, यावर वक्तव्य केले आहे.

मानसी नाईकने ‘कलाकट्टा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले गेले की, तू इतकी वर्षं चित्रपटांत काम का केलं नाहीस? चित्रपट वाट्याला येत नाहीत की तू भूमिका नाकारत आहेस? त्यावर मानसी म्हणाली, “असं अजिबात नाही. मी कधीच कुठल्याही कामाला लहान-मोठं समजत नाही. मी काम करते. मग ते कोणत्याही रूपात असो.”

“माझ्यासाठी परीक्षा…”

मानसी पुढे म्हणाली, “चित्रपट आले नाहीत, असं नाही. चित्रपटासाठी मला विचारणा झाली. जेव्हा मी पदार्पण केलं, तेव्हाही मी चित्रपटातून पदार्पण केलं होतं. मग मालिका केली. नंतर माझं काम सुरू झालं. सध्या ज्या पद्धतीचे सिनेमे मराठीमध्ये बनत आहेत, ते पाहिल्यानंतर मी काहीतरी गमावलं, असं मला अजिबात वाटत नाही.”

“मराठी इंडस्ट्री कंटेटसाठी ओळखली जाते. कंटेंट हा हीरो असतो. मला काम करायचं होतं की, मला अभिनय करायचा होता, हा फरक आहे. मला अभिनय निवडायचा होता. आपण चित्रपटात दिसतोय, आपण चित्रपट केला, तो प्रोफाइलमध्ये दिसणार, मला असं काम करायचं नाही आणि यापुढेसुद्धा मी तसं कधीच करणार नाही. मला असं काहीतरी काम करायला आवडतं, ज्यामुळे प्रेक्षकवर्ग माझ्यासाठी थांबतो.”

मानसी असेही म्हणाली, “मला तसा चित्रपट किंवा कंटेंट मिळाला असता, तर मी नक्कीच काम केलं असतं. जे मला मिळालं नाही, त्याचा मला काही पश्चात्ताप वाटत नाही. मी असंही म्हणणार नाही की, लोकांनी मला संधी दिली नाही किंवा माझ्यावर विश्वास दाखवला नाही. कारण- प्रत्येकाची निवड असते. मी तरी असं काय केलं होतं की, त्यांनी मला निवडावं. तर, मला कळलं की, काम करताना नेटवर्किंग खूप महत्त्वाचं आहे. त्या नेटवर्किंगमध्ये कोणीतरी तुमच्यासाठी बोलणारं पाहिजे.

हा ब्रेक घेतल्यानंतर चित्रपटात दोन पात्री काम करणं ही माझ्यासाठी परीक्षा होती. पण, बरं झालं की, मी तो ब्रेक घेतला. कारण- ज्या चित्रपटात मी काम केलं, त्यात लक्ष केंद्रित करून काम करणं महत्त्वाचं होतं. जर मी इतर चित्रपटात काम करत असते, तर मी तितकं लक्ष केंद्रित केलं नसतं. मला दडपणाखाली काम करायला आवडतं आणि मी तसंच पुढेदेखील काम करणार आहे.”

दरम्यान, ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.