Marathi Actor Went For Jyotirlinga Darshan : श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अभिषेक, महापूजा, आरती असे बरेच कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात येतात. श्रावण महिना भगवान शिवशंकराला समर्पित मानला जातो आणि शिवभक्तांसाठी तो अत्यंत पवित्र असतो. भक्त मोठ्या श्रद्धेने या दिवशी उपवास आणि पूजा करतात. आज पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी भगवान शिवशंकराची मनोभावे पूजा केल्याचं पाहायला मिळालं.
अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी या अभिनेत्री काही दिवसांपूर्वीच केदारनाथ यात्रेला जाऊन आल्या. प्राजक्ता गेल्या काही महिन्यांपासून तिची १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण करत आहे. आज श्रावणी सोमवारनिमित्त मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओकने देखील ज्योतिर्लिंग यात्रेचा संकल्प केला आहे. याचा खास व्हिडीओ त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त प्रसाद ओक त्र्यंबकेश्वरला पोहोचला होता. यावेळी त्याची पत्नी मंजिरी देखील उपस्थित होती. मंदिरात दर्शन घेतानाचा व्हिडीओ मंजिरीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
मंजिरी ओकची पोस्ट
गोदावरीतटी एका ठायी नांदताती तिघे, ब्रह्मा विष्णु महेश…वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीस… भक्त लोटती भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास…त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती… तिथे नांदे शंभू कैलासाचा पती.
आजपासून आमच्या १२ ज्योतिर्लिंग यात्रेला सुरुवात होत आहे…पहिला श्रावणी सोमवार, हर हर महादेव!
प्रसाद आणि मंजिरीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘हर हर महादेव’ म्हणत चाहत्यांनी प्रसाद ओकला १२ ज्योतिर्लिंग यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, प्रसाद ओकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, मराठी नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याला ओळखलं जातं. नुकताच तो ‘गुलकंद’ सिनेमात झळकला. यामध्ये त्याच्यासह सई ताम्हणकर, समीर चौघुले आणि ईशा डे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘सुशीला-सुजीत’ सिनेमाला सुद्धा प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.