प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला सुजीत’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. १८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून यामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. स्वप्नील, सोनालीच्या कामाचं खूप कौतुक होतं आहे. पण, दुसऱ्या बाजूला प्रसादने साकारलेल्या गुरुजींची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करून ‘सुशीला सुजीत’ चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे.

‘सुशीला सुजीत’ चित्रपटाचं पोस्टर शेअर करून समीर चौघुले यांनी लिहिलं, “सुशीला सुजीत…एक धमाल, अतरंगी अत्यंत वेगळ्या विषयावरचा चित्रपट…प्रसाद ओक नेहमीच आपल्या दिग्दर्शन कलाकृतींमधून कमालीच वैविध्य जपत असतो…’कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ आणि आता ‘सुशीला सुजीत’…एका दाराआड घडणारी ही अत्यंत धम्माल गोष्ट या वेळी प्रसादने रसिकांसमोर आणली आहे…अजय कांबळे यांचं चुरचुरीत आणि तुफान हसवणाऱ्या संवादाची फोडणी या चित्रपटाला चार चांद लावते…वाह अजय वाह.”

पुढे समीर चौघुलेंनी लिहिलं, “सोनाली कुलकर्णी…लाजवाब गं…आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीच्या या टप्प्यावर ही अशी अत्यंत वेगळ्या धाटणीची भूमिका सोनालीला प्रसादने दिली आणि ती त्यात मुक्तपणे बागडलीय…आणि स्वप्नील जोशी ..वाह वाह ..याचा कॅमरा समोरील सहज वावर नेहमीच अचंबित करतो…सहज सुंदर अभिनयाने स्वप्नील ही तुफान बॅटिंग करतो…विशेष उल्लेख सुनील तावडे ..लाजवाब ..केवळ मुद्राभिनयावर सुनीलने काही प्रसंगात अशी काही धमाल उडवून लावलीय की अख्खं थिएटर हसून हसून लोटपोट होतं.”

“अत्यंत प्रभावी पार्श्वसंगीत तन्मय भिडे यांचं खूप कौतुक …आणि last but not the least…जादूगार संजय मेमाणे यांच्या कॅमराची जादू ..विलोभनीय…हा माणूस केवळ अशक्य आहे …रसिकांनो, ‘सुशीला सुजीत’ तुमचं १०० टक्के तुफान मनोरंजन करतो…वेगळा वरकरणी सोप्पा पण कठीण विषय मांडून काहीतरी महत्वाचं सांगू पाहतोय..नक्की जाऊन पाहा आजच जवळच्या चित्रपटगृहात,” असं आवाहन समीर चौघुलेंनी आपल्याला चाहत्यांना केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, समीर चौघुलेंच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच त्यांचा ‘गुलकंद’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ते सई ताम्हणकरसह पाहायला मिळणार आहेत. सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद’ चित्रपट १ मेला प्रदर्शित होणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले व्यतिरिक्त प्रसाद ओक, ईशा डे महत्त्वाच्या दिसणार आहेत.