Ashwini Bhave Ayodhya Ram Mandir Visit Video : मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधून काम करीत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी प्रेक्षकांचंही त्यांनी मनोरंजन केलं आहे.
अश्विनी भावे यांनी किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केले आणि त्यानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. अमेरिकेमध्ये राहूनही त्यांची भारताशी असलेली नाळ काही तुटलेली नाही. कामातून ब्रेक घेत त्या अमेरिकेहून भारतात येत असतात. अभिनयासह त्या सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्या आपले फोटो-व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
अश्विनी भावे यांनी नुकतंच अयोध्येतील राम मंदिराचं दर्शन घेतलं आहे. अभिनेत्री आपल्या आईसह अयोध्येत पोहोचल्या होत्या आणि तिकडे मराठी प्रेक्षकांना पाहून त्या भारावल्या. अयोध्येत आपल्या मराठी प्रेक्षकांना पाहून झालेला आनंद त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमधून व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अश्विनी भावे म्हणतात, “एक मजेशीर गोष्ट शेअर करतेय. मी माझ्या आईला आणि आईच्या मैत्रिणीला घेऊन अयोध्येला राम मंदिराचं दर्शन घ्यायला आले आहे. इकडे विमानतळावर मला इतकी मराठी माणसं, मराठी प्रेक्षक मिळाले की, त्यांना पाहून मला आनंदाचं भरतं आलं. मराठी माणसं, मराठी प्रेक्षक आम्हा मराठी कलाकारांवर किती प्रेम करतात याचं हे उदाहरण आहे.”
त्यानंतर अश्विनी विमानतळावरील मराठी प्रेक्षकांकडे कॅमेरा फिरवतात आणि म्हणतात, “आम्ही सगळ्यांनी राम मंदिराचं दर्शन आणि अयोध्या नगरीचं उत्तम दर्शन घेतलं. मराठी माणसं कुठेही भेटली तरी त्यांचं प्रेम असं ओसंडून वाहतं. जय श्रीराम!” दरम्यान, अश्विनी भावे यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईइक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी त्यांच्या या प्रेमळ स्वभावाचं कौतुकही केलं आहे. तसंच अनेक चाहत्यांनी त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
अश्विनी भावेंनी शेअर केलेला इन्स्टाग्राम व्हिडीओ
अश्विनी भावे या दिवाळीनिमित्त भारतात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी दिवाळीनिमित्त सजावट करतानाचा आणि कंदील लावतानाचाही एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्या घरातील बाल्कनीमध्ये कंदील लावताना दिसल्या. दिवाळीनिमित्त सजावटीचा व्हिडीओ शेअर करीत त्यांनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, मराठीसह हिंदी चित्रपटांतही त्यांनी काम केले आहे. ‘शाब्बास सूनबाई’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज’, ‘वजीर’ ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘ध्यानीमनी’सारख्या अनेक मराठी आणि ‘जखमी दिल’, ‘मोहब्बत की आरजू’, ‘बंधन’सारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांत काम करीत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.