Shaky Song Dance Video : सोशल मीडियावर सध्या संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने धुमाकूळ घातल्याचं पाहायल मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. अवघ्या महिन्याभरात या गाण्याला सर्वांची पसंती मिळाली आहे. इन्स्टाग्राम रील्सपासून ते युट्यूब शॉर्ट व्हिडीओमध्ये नेटकरी या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांत बॉलीवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी ‘शेकी’ गाण्यावर ‘एक नंबर, तुझी कंबर’ म्हणत ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. आता मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एका अभिनेत्रीला संजूच्या शेकी गाण्याची भुरळ पडली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे रितिका श्रोती.
‘बकेट लिस्ट’, ‘बॉईज’, ‘लंडन मिसळ’, ‘मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय चित्रपटांमध्ये रितिकाने काम केलेलं आहे. अभिनेत्री फक्त २४ वर्षांची आहे. रितिकाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. सध्याच्या घडीला रितिकाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकताच तिने संजू राठोडच्या सर्वत्र ट्रेंडिंग असणाऱ्या ‘शेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी रितिका श्रोतीच्या हटके लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. घागरा, कानात झुमके, केसात गजरा या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने या व्हिडीओला “या गाण्यावर तर Reel बनवलंच पाहिजे” असं कॅप्शन दिलं आहे. तसेच अभिनेत्रीने या व्हिडीओमध्ये संजू राठोडला टॅग देखील केलं आहे.
रितिकाच्या व्हिडीओवर संजूने “किती सुंदर” अशी कमेंट करत हार्ट इमोजी दिले आहेत. याशिवाय नेटकऱ्यांनी सुद्धा अभिनेत्रीच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याबद्दल सांगायचं झालं, तर सध्या हे गाणं सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झालं आहे. ‘Shaky’ या गाण्याचा लेखक आणि गायक स्वत: संजू राठोड असून, या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. या गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये संजूच्या सोबतीला हिंदी ‘बिग बॉस’ गाजवणारी अभिनेत्री ईशा मालवीय झळकली आहे.