आपल्या डान्सच्या कौशल्याने सर्वांची मन जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणून दीपाली सय्यद यांना ओळखले जाते. दीपाली सय्यद या राजकीय क्षेत्रात सध्या चांगल्याच सक्रीय आहेत. काही दिवसांपूर्वी दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. सध्या दीपाली सय्यद या त्यांच्या आईबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. याचा एक व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.
दीपाली सय्यद यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी त्यांच्या आई रत्नप्रभा भोसले यांची झलक दाखवली आहे. दीपाली सय्यद यांच्या आईचा येत्या १७ ऑगस्टला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने दीपाली ही त्यांना कोकणात घेऊन जाताना दिसत आहे.
आणखी वाचा : “बुकींगची घट, निर्मात्यांशी वाद अन्…” वैभव मांगलेंनी सांगितलं ‘अलबत्या गलबत्या’ नाटक सोडण्याचे खरं कारण, म्हणाले “मुलं मोकळी असतात तेव्हा…”
दीपाली सय्यद यांची पोस्ट
“सौ. रत्नप्रभा हरिश्चंद्र भोसले, आयुष्यात पहिल्यांदा उभं रहायला तिनं शिकवलं… उभं राहील्यावर खाली पाहीलं तर एक मोठी सावली दिसली… त्या सावलीनं सांगितलं मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मग बिनधास्त मागे वळून न पाहता पुढे जाण्याचं बळ मिळत गेलं…
जिने सावली बनून खंबीरपणे उभं राहण्याचं बळ दिलं तिचा birthday week आहे…., वाढदिवसाच्या शुभेच्छा आई”, असे कॅप्शन दीपालीने या व्हिडीओला दिले आहे.
दीपाली यांनी या व्हिडीओबरोबरच आणखी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. त्यात दीपाली यांनी त्यांच्या आईला तुझं माहेरचं नाव काय होतं, असा प्रश्न विचारला आहे. “माझं माहेरचं नाव रत्नप्रभा गणपतराव शिंदे. मी शेतकऱ्याची मुलगी. माझ्या वडिलांची दसपटीला आधी सही लागायची. त्यांचं नाव गणपत केशवराव शिंदे असं होतं”, असे दीपालीच्या आईने म्हटले आहे.
दरम्यान दीपाली सय्यद ही सध्या आईबरोबर कोकणची सफर करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. तिने याचे अनेक व्हिडीओही शेअर केले आहेत. सध्या दीपाली आणि तिच्या आईचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.