Mana Che Shlok Movie : मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक हा सिनेमा १० ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. मात्र, त्याआधीपासूनच या सिनेमाला वादाचा सामना करावा लागला. या चित्रपटाच्या नावाला काही संघटनांनी जोरदार विरोध केला होता. याचबरोबर चित्रपटाचं प्रदर्शन थांबविण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने गुरुवारी ( ९ ऑक्टोबर ) या सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला.
विशेष म्हणजे, हा निर्णय देताना न्यायालयाने, ‘जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे’ या समर्थ रामदास स्वामींच्या ‘मनाचे श्लोका’तील पंक्तींचा संदर्भ दिला होता. या निर्णयानंतरही पुण्यात या सिनेमाचे दोन शो बंद पाडण्यात आले. याविरोधात आता मराठी कलाकार एकत्र आले आहेत. अशाप्रकारे एखाद्या सिनेमाचं प्रदर्शन थांबवणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही ‘मना’चे श्लोक या चित्रपटाच्या टीमच्या पाठिशी आहोत असं ठाम मत मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आहे.
अभिनेत्री नेहा शितोळे पोस्ट शेअर करत लिहिते, “काल पुण्यात जे काही घडलं त्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. कलाकार म्हणून आमच्या कपड्यांवर, वैयक्तिक आयुष्यावर, आमच्या मतांवर, आम्ही निर्माण केलेल्या कलाकृतींवर तुमच्या मनात खरंतर स्वत:च्या आयुष्यात असमाधानी असण्याबद्दल आणि यंत्रणेविषयी असमाधानी असल्यामुळे साठलेला राग काढणं सोपं आहे. नुसतेच आपला साठलेला राग काढायला सिनेमाचे पोस्टर फाडणाऱ्यांनो…आमचं काम बंद करायला लावणाऱ्या, कायदा भंग करणाऱ्या ‘संस्कृती रक्षकांनो’ कधीतरी आयुष्यात नीट विचार करून कुठल्या विचाराला पाठिंबा द्यायचा आणि कुठल्या नाही हे ठरवा. आपल्या मनाचं ऐका…चिथवणाऱ्या लोकांचा हेतू समजून घ्या…’मना’चे श्लोक या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबर मी वैयक्तिकरित्या ठामपणे उभी आहे.”
दिग्दर्शक आशीष बेंडे लिहितो, “सिनेमाचं पोस्टर, टीझर येऊन बरेच दिवस झाले. त्याच हेच टायटल होतं, तेव्हा कुणी पेटून उठलं नाही. पण बरोबर प्रीमियरच्या दिवशीच भावना दुखावल्या जातात हे जरा गमतीशीर आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असल्यास सेन्सॉर बोर्ड, कोर्ट यांच्याकडे ‘वेळेत’ जायला हवं होतं. सेन्सॉर वगैरे सह सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यावर शो बंद पाडणे आणि निर्मात्यांचं नुकसान तसेच जमलेल्या प्रेक्षकांचा रसभंग करणं हे मुळात बेकायदेशीर आहे.”
“तिकडे जोरजोरात आरडाओरडा करून शो बंद पाडणाऱ्या किती लोकांना श्लोक पाठ आहेत? २५ ऑगस्टला सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून हे लोक झोपले होते का? आधीच मराठी सिनेमा काठावर उभा राहून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करतोय आणि त्यात हे नवीन…” अशी पोस्ट सचिन गुरव यांनी शेअर केली आहे.

यासह सायली संजीव, सोनाली कुलकर्णी, आदिनाथ कोठारे, गिरीजा ओक, सुहृद गोडबोले यांनी सुद्धा या घटनेचा निषेध नोंदवत आम्ही या सिनेमाच्या टीमच्या आम्ही पाठिशी आहोत असं म्हटलं आहे.