आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजेच नम्रता संभेराव. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांतून चोख भूमिका साकारत नम्रताने प्रेक्षकांची मने जिंकली. नम्रता सध्या तिच्या ‘नाच गं घुमा’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात नम्रता एका मोलकरणीची भूमिका साकारत आहे. त्यादरम्यान नम्रताने एका मुलाखतीत आयुष्यभर जपणारा तिचा असा एक अनुभव शेअर केला आहे.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिने बॉलीवूड अभिनिते बोमन इराणी यांच्याबद्दलचा किस्सा सांगितला. नम्रता म्हणाली, “व्हेंटिलेटर सिनेमाच्या वेळेचा एक किस्सा आहे. तो अनुभव मी आयुष्यभरात कधीच नाही विसरणार. ‘व्हेंटिलेटर’ सिनेमाच्या शूटदरम्यान, जेव्हा आम्ही शूट करीत होतो तेव्हा बोमन इराणींनी माझ्या कामाचं खूप छान कौतुक केलं होतं. ते म्हणाले होते की, मी तुमची ही भाषा कुठेतरी वापरणार आहे. तेव्हा मला खूप भारी वाटलं होतं. मी त्यांना म्हटलं होतं की, सर, मला तुमचा ऑटोग्राफ हवाय. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. तर ते म्हणाले की, मीच तुझा खूप मोठा फॅन झालोय.”

हेही वाचा… ठरलं तर मग: अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आलं साक्षीसमोर; चैतन्य खुलासा करत म्हणाला “ते खरे नवरा बायको…”

“त्यानंतर आमचं पॅकअप झाल्यावर मी निघाले आणि मी रिक्षा बघत होते. मी रिक्षासाठी थांबले होते. तर मागून बोमन इराणी आले आणि ते म्हणाले, “नम्रता, तू कुठे जातेयस?” तेव्हा मी म्हणाले, “मी घरी काळाचौकीला जातेय.” तर ते म्हणाले, “तू, रिक्षातून का जातेयस?” तर मी म्हणाले, “हो, मी रिक्षानंच जाईन. आता गाडी नाही आहे. तेव्हा त्यांनी माझं सामान त्यांच्या पीएकडे द्यायला सांगून, त्यांच्या बीएमडब्ल्यूमध्ये ते ठेवायला सांगितलं आणि मला गाडीत मागे बसवायला सांगितलं. ते घरी जाईपर्यंत मला इतक्या वेळा म्हणाले की, सॉरी नम्रता, मी दादरला उतरेन. त्यानंतर तू पुढे काळाचौकीला जा; चालेल ना तुला वगैरे. हे नम्रपणे वागणं मी त्यांच्याकडून शिकले.”

“तेव्हा त्यांनी मला एक वाक्य सांगितलं होतं की, कधीच सेटवर आपल्याकडून नकारात्मकता नाही पसरली पाहिजे. आपण नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे. आम्ही हॉस्पिटलमध्ये एका खऱ्या लोकेशनवर शूट करीत होतो आणि तिथे अत्यंत गरम होतं होतं. पण, तो माणूस ‘ओ एस’साठी थांबला होता. त्याचा फक्त खांदा दिसणार होता. तो इतका मोठा माणूस आहे की, तिकडे डमी उभा करून ठेवला असता तरी चाललं असतं किंवा ते जरी म्हणाले असते की, डमी उभा करा; मी इथे थांबणार नाही. पण, ते फक्त खांदा देण्यासाठी पूर्णवेळ तिथे उभे राहिले. समोरच्या आर्टिस्टला ते जाणवलं पाहिजे. ती तीव्रता जाणवली पाहिजे. कारण- तो सिनेमाचा सीन असणार आहे. त्यात त्यांचा क्लोजअप दिसणार आहे. तर या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले.”

हेही वाचा… ‘रामायण’ चित्रपटातील रणबीर कपूर व साई पल्लवीचा फोटो व्हायरल, पाहा दोघं कसे दिसतात प्रभू श्रीराम व सीतेच्या भूमिकेत

“तर ते पुढे म्हणाले की, आपण खूप गरम होतंय, हे होतंय, ते होतंय ही नकारात्मकताच नाही पसरवायची. आपण सेटवर छान छान राहायचं. म्हणजे आपल्यामुळे ते वातावरण खूप छान होईल.”

“तर मी म्हटलं की, सर, मी पहिल्यांदा तुमच्या बीएमडब्ल्यूमध्ये बसलेय. मला खूप छान वाटतंय. तर ते म्हणाले, मीही जेव्हा बसलो होतो तेव्हा मीपण पहिल्यांदाच बसलो होतो. तर, तूसुद्धा जेव्हा बसशील तेव्हा स्वत:च्या हिमतीवर बीएमडब्ल्यूमध्ये बसशील.”

हेही वाचा… “संकर्षण कऱ्हाडे भित्रा ससा होता”, अभिजीत खांडकेकरने सांगितला मित्राबद्दल ‘तो’ किस्सा, म्हणाला…

“या माझ्या आयुष्यात ज्या काय सकारात्मक गोष्टी घडल्यात ना एका सेलिब्रिटीकडून त्या मी कधीच विसरणार नाही. मी त्या आयुष्यभर लक्षात ठेवते की, सेटवर नेहमी कसं वातावरण सकारात्मक ठेवायचं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नम्रता संभेरावचा आगामी चित्रपट ‘नाच गं घुमा’ १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नम्रता संभेराव आणि मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकांत आहेत; तर, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मायरा वायकुळ, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, सुनील अभ्यंकर यांच्याही निर्णायक भूमिका या चित्रपटात आहेत.