‘टीडीएम’ हा मराठी चित्रपट येत्या ९ जूनला पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. भाऊराव कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित झाला होता. परंतु, चित्रपटाला सिनेमागृहांत स्क्रीन न मिळाल्याने ‘टीडीएम’ पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय दिग्दर्शक व चित्रपटाच्या टीमने घेतला. अनेक कलाकारांनी भाऊराव कऱ्हाडे यांच्या या चित्रपटाला स्क्रीन मिळण्यासाठी पोस्टही केल्या होत्या. आता खासदार सुप्रिया सुळेंनी टीडीएम चित्रपटासाठी एक पोस्ट केली आहे.

सुप्रिया सुळेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘टीडीएम’ चित्रपटातील एका कलाकाराने नुकतीच सुप्रिया सुळेंची भेट घेतली. ऋषी काळे असं या कलाकाराचं नाव असून तो ‘टीडीएम’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. सुप्रिया सुळेंनी त्यांच्या पोस्टमधून ‘टीडीएम’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन केलं आहे. तसंच अजित पवार व सुप्रिया सुळेंनी हा सिनेमा पाहिल्याचं त्यांनी व्हिडीओत म्हटलं आहे.

हेही वाचा>> “भर रस्त्यात तलवारीने वार करून…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले, “पुरूषी वर्चस्वाचा माज…”

“आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याचे सुपुत्र आणि विद्या प्रतिष्ठानचे माजी विद्यार्थी ऋषि विलास काळे यांची भेट झाली. ऋषी लवकरच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. भेटीदरम्यान त्याचा कलाक्षेत्रातील प्रवास जाणून घेऊन त्याचे अभिनंदन केले. त्याला ९ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. आपणही सर्वांनी हा चित्रपट नक्की पाहा,” असं सुप्रिया सुळेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “तू पनवती आहेस”, श्रेयस तळपदेने सांगितला मालिकेच्या ऑडिशनदरम्यानचा प्रसंग, म्हणाला, “त्यावेळी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टीडीएम’ चित्रपटात अभिनेता पृथ्वीराज थोरात व अभिनेत्री कालिंदी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातील कलाकारांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चित्रपटाला शो मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर झाले होते.