Ashok Sarafs Name Included In London Book of World Records: ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना नुकतेच ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. आता त्यांचे नाव लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आल्याचे वक्तव्य निवेदिता सराफ यांनी केले आहे.

पद्मश्री अशोक सराफ यांच्या नावाचा ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाला समावेश

निवेदिता सराफ यांनी नुकताच ‘मराठी मनोरंजन विश्व’बरोबर संवाद साधला. अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या, “मी व अशोक भाग्यवान आहोत, कारण तरुण पिढीचं प्रेम त्याला लाभलं आहे. असं एकाच्याही मनात आलं नाही की या व्यक्तीला हा पुरस्कार का मिळाला. ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार मिळाला तेव्हादेखील असाच सगळ्यांचा प्रतिसाद होता.

देवाच्या कृपेने अशोक सराफ यांना ७५ वर्षे पूर्ण केल्यावर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाला. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ मिळाला. काल ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला आहे.

चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल निवेदिता सराफ म्हणाल्या, “अशोक सराफ यांना पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी, सगळ्या कलाकारांनी जे प्रेम व्यक्त केलं, ते खूप महत्त्वाचं आहे.”

“आम्ही आता आई-वडिलांच्या भूमिकेत आहोत. या कलाकारांचं यश बघून त्यांच्या आई-वडिलांना जितका आनंद होतो, तितकाच आम्हा दोघांना होतो. तर जे हे प्रेम आहे, ते मला फार महत्त्वाचं वाटतं. बाकी सगळं येतं-जातं. प्रसिद्धी येते-जाते, पण हे सगळ्यांचं जे प्रेम आहे ते खूप ग्रेट वाटतं. अशोक खूप भाग्यवान आहेत, महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचं प्रेम त्यांना मिळालं.”

पुढे अभिनेत्री म्हणाल्या, “१९८८ ला जेव्हा त्यांचा अपघात झाला, तेव्हा सोशल मीडिया नव्हता, मोबाइल फोन्स नव्हते. पण, तेव्हा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांनी त्यांच्यासाठी नवस केले होते. जवळजवळ वर्षभर आम्ही नवस फेडत होतो. त्यांना बरं वाटू दे, यासाठी एक माणूस कोल्हापूरहून चालत सिद्धिविनायकला आला होता. इतकं प्रेम त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने दिलं आहे, त्याची आम्ही कधीच उतराई करू शकणार नाही”, असे म्हणत निवेदिता सराफ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या निवेदिता सराफ या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करताना दिसत आहेत. या मालिकेत त्यांनी शुभा ही भूमिका साकारली आहे.