Pooja Sawant : राज्यभरात ६ जुलैला मोठ्या जल्लोषात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी आषाढी एकादशीनिमित्त मनोभावे पूजा करून. खास पोस्ट शेअर सर्वांना शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय काही कलाकार विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला देखील पोहोचले होते. अनेकांनी वारीतही सहभाग घेतला होता. अशातच आता महाराष्ट्राची ‘कलरफुल’ अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केलेला व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे.
यंदा पूजाने आषाढी एकादशीचा सण पतीसह ऑस्ट्रेलियात साजरा केला. पूजाचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे अभिनेत्री देखील मुंबई ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास करत असते. चित्रपटांचं शूटिंग असलं की ती मुंबईत येते आणि बाकीचे दिवस ऑस्ट्रेलियात राहते. यावर्षी पूजाने आषाढी एकादशीचा उपवास सोडताना देवाला दाखवण्यासाठी खास नैवेद्य केला होता.
“नैवेद्य करायचा माझा छोटासा प्रयत्न” असं कॅप्शन देत पूजाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. वरण-भात, चवळीची उसळ, चपाती, अळुवडी, बट्ट्याची भाजी, शिरा असं सगळं साग्रसंगीत जेवण पूजाने केलं होतं. यानंतर अभिनेत्रीने देवाची मनोभावे पूजा करून नैवेद्य दाखवला.
पूजा हा व्हिडीओ शेअर करत म्हणते, “पहिल्यांदाच नैवेद्य बनवण्याचा प्रयत्न केला. जेवण बनवणं खूप कठीणच आहे पण, त्याहूनही कठीण आहे ते जेवण बनवताना सगळ्या गोष्टी शूट करणं…मी पुन्हा जेवण बनवताना कदाचित असं रेसिपी शूट नाही करणार.”
पूजाने ऑस्ट्रेलियात राहूनही आपली मराठमोळी परंपरा जपत आषाढी एकादशीचा उपवास सोडताना नैवेद्याचं जेवण बनवलं होतं; त्यामुळे सध्या अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. या व्हिडीओवर पूजाने “खेळ मांडियेला वाळवंटी घाई” हे गाणं लावलं आहे.
दरम्यान, पूजाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकली. तिने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. अभिनेत्रीचा पती कामानिमित्ताने ऑस्ट्रेलियात राहतो. त्यामुळे पूजा कधी ऑस्ट्रेलिया तर कधी मुंबईत असते. परदेशात राहूनही पूजा मराठी परंपरा, मराठीसण मोठ्या उत्साहाने साजरे करताना दिसते.