‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत मराठीसह हिंदी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची व सौंदर्याची मोहिनी घालणारी ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईल अंदाजमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली. पूजा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
त्याचबरोबर पूजा सोशल मीडियाद्वारे तिच्या आगामी कामाबद्दल आणि खासगी आयुष्यातील काही रंजक माहितीदेखील शेअर करत असते. पूजा सावंत ही कोकणातील असून दरवर्षी ती कोकणात आपल्या मूळगावी जात असते. कोकणात एका डोंगऱ्याच्या पायथ्याला अभिनेत्रीने टुमदार घर बांधलं आहे. याचे अनेक फोटो व व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
अशातच पूजाने तिच्या कोकणातील घराबद्दलची खास आठवण शेअर केली आहे. ‘स्टार मीडिया मराठी’शी बोलताना पूजाला तिच्या कोकणातील आठवणींबद्दल विचारण्यात आलं. यावेळी पूजा उत्तर देत असं म्हणाली, “माझ्याकडे फक्त कोकणातल्याच आठवणी आहेत. बाकी कुठल्या नाही. कोकण सोनं आहे. कोकणात सावंतांचं बऱ्यापैकी जमीन वगैरे आहे; पण ते सगळं बाजूला ठेवून आम्ही एका डोंगऱ्याच्या पायथ्याशी एक छोटंसं घर बांधलं आहे.”
यापुढे ती म्हणाली, “आमचा अजिबात मोठा वाडा वगैरे नाही, अगदीच छोटंसं घर आहे. तिकडे मी वर्षातून दोनदा तरी जातेच. आम्ही सगळ्यांनी छोटी छोटी झाडे लावली होती आणि आता ते झाडे मोठी झाली आहेत, त्याला फळं आली आहेत हे बघून खूपच भारी वाटतं. माझे आई-वडील कोकणातच असतात. ते अजिबात माझ्या ट्रेलर लॉंच किंवा प्रीमियरला येत नाहीत. ते म्हणतात तू तुझं तुझं कर आम्ही कोकणात आहोत.”
यानंतर पूजाने सांगितलं की, “आज सकाळी मला बाबांनी व्हिडीओ पाठवला की, आम्ही लावलेली झाडं आता मोठी झाली आहेत आणि त्याला आंबे आले आहेत. तर आमच्या घराच्या अंगणात एक मोर रानातून चालत आला, त्याने काहीतरी खाल्लं. मग तो गेला. यावर मी वडिलांना मेसेज केला की, अजून काय पाहिजे. हे सुख कोकणातच मिळतं आणि हे पैशात मोजता येत नाही.”